पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजही त्या कमानी आहेत. तशा तिथेही कमानी होत्या. ती पाणी पुरवठ्याची योजना जपायची. म्हणून रस्ता वळवला होता. एक वळण देऊन, नियमाला अपवाद करून त्यांनी वारसा जपला.

प्रश्न - आठवण जपण्यासाठी वळण घेतले तर...

उत्तर - त्यांनी प्राचीन पाणी पुरवठा योजनेचे जतन केले. आज हायड्रॉलिक पद्धतीनी पाणी पुरवठा केला जातो. आपणाला आज जर पाणी पुरवठ्याचा इतिहास लिहायचा झाला तर ती योजना कामी येते.

प्रश्न - आठवण म्हणून त्यांनी ती योजना जपली का?

उत्तर - नुसती आठवण नाही. इतिहास जपला. पाणी पुरवठ्याचा इतिहास सुरू होतो गुरुत्वाकर्षणापासून. एका छोट्या गोष्टीचा आपण इतिहास जपण्याची साक्षरता आपण जेव्हा आपल्या मनामध्ये जपतो, तेव्हाच ख-या अर्थाने जतन साक्षरता समाजात रुजते.

प्रश्न - सर, आपण प्रक्रियेचा जेव्हा विचार करतो - तो अगदी शालेय जीवनापासून ... तुम्ही असं यापूर्वी तीन गटातली वर्गवारी सांगितली. शिक्षित, सुशिक्षित नि स्वशिक्षित - ज्यांनी दुस-यांसाठी काही केले, स्वतःची चौकट सोडून... मला सांगा ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हटलं जातं... शालेय स्तरावर एखाद्या मुला-विद्याथ्र्यात वेगळेपण आहे, याची जाणीव फक्त त्याच्या शिक्षकाला नि पालकांना होऊ शकते. ही जाणीव जतन करण्यासाठी प्रयत्न होताना, करताना नेमके काय करणे अपेक्षित असते?

उत्तर - मला असं वाटते की आई-वडिलांनी जन्मापासून मुलांच्या छोट्या छोट्या वस्तू जपल्या पाहिजेत. मी माझे एक छोटे उदाहरण सांगतो. माझ्या मुलाचा पहिला दात पडला. तो त्याने माझ्याकडे आणून दिला. मी एका छोट्या डबीत तो जपून ठेवला आहे. तुम्ही म्हणाल की तो काय महंमद पैगंबर होणार आहे का? त्यांचा केस जपून ठेवलाय, तसा तुम्ही तुमच्या मुलाचा दात जपून ठेवलाय. प्रश्न दात नि केसाचा नाही. प्रश्न आहे माणसाच्या विकासाचा. विकास जपणे ही प्रक्रिया प्रत्येक पातळीवर, अवस्थेत जपण्याची गोष्ट आहे. मी साधे साधे प्रश्न लोकांना विचारतो की तुमचा पहिला फोटो तुमच्याकडे आहे का? तुमचं पहिले हस्ताक्षर आहे का? तुमचे पहिले झबले आहे का? तुम्ही ओढलेल्या पहिल्या सिगरेटचे थोट्रक जपले आहे का? तुम्ही लिहिले

आकाश संवाद/१०५