पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटक होतं ? त्यानं मला अगदी खात्री दिली होती की, ॲलिसचं न् त्याचं मुळीच पटत नाही, तिलाही त्याच्याइतकीच वेगळं होण्याची इच्छा आहे, आणि प्रश्न फक्त थोडा वेळ थांबण्याचा आहे. मी म्हणाले, "कितीही थांबायला माझी तयारी आहे."
 "पण माझी नाही ना ! मला तेवढा वेळ कुठेय ?" मग तो म्हणाला, "अवन्ती, माझ्यासारख्या म्हाताऱ्या खोडावर तू खरंच प्रेम करू शकतेस ?"
 "प्रेमाचा वयाशी काही संबंध नसतो रुस्तुम. आणि तू 'म्हातारं खोड' कधीच होणं शक्य नाही."
 त्याचे सगळे आडाखेच चुकले होते आणि ते कबूल करण्याएवढं मनोधैर्य त्याच्यात नव्हतं?
 आज इतकी वर्षं झाली तरी ते मनोभंगाचं दुःख विसरता येत नाही. बाहेरचं जग, माझे आईबाप, आमच्या वयातली तफावत ह्यांचा कशाचाही विचार न करता मी स्वतःला त्या नात्यात झोकून दिलं होतं. तो मात्र हातचा ठेवून वागला ह्याचा अपमान तीव्र होता पण मी तो पचवला. पचवावाच लागला मला. ॲलिसने केलेल्या तमाशानंतर तो मला भेटायला आला नाही, स्वतःविषयी समर्थन देण्यासाठी सुद्धा, ह्यातच मला सगळं कळलं आणि तरीही त्यावेळी तरी मी ह्या प्रकाराबद्दल ॲलिसलाच दोष देत होते. ज्याचं आपल्यावर मुळा सुद्धा प्रेम नाही त्याला कायद्याच्या आधाराने धरून ठेवणं हे मला भयानक वाटत होतं. रुस्तुम दुबळा असेल. पण विश्वासघातकी नाही असं मी धरून चालले होते.
 नंतर काही वर्षांनी एकदम रुस्तुम मला पुन्हा भेटायला आला. खूपच म्हातारा वाटला एकदम. मनात म्हणाले, हा काही चार-पाच वर्षांत इतका म्हातारा झाला नाही.
 "रुस्तुम, तू? काही विशेष ?"
 "काही नाही, सहज भेटायला आलो."

५८ - ॲलिस