पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अवन्तिका



 एक लहानशी बातमी. "प्रसिद्ध चित्रकार रुस्तुम मोदी ह्यांच्या पत्नी ॲलिस ह्यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या." शेवटी नवऱ्याचं शेपूट धरून ह्या बाईने मरताना का होईना, वर्तमानपत्रात स्थान मिळवलं. तिच्या ह्या देशात येण्याचं सार्थक

झालं.
 तिनं माझा अपमान करून मला घरातनं हाकलून दिलं, त्यानंतर मी पुन्हा तिकडे गेलेच नाही. वाटलं होतं कदाचित रुस्तुम भेटायला येईल. पण त्या दिवशी तिच्यासमोर तो काहीच बोलला नाही, तेव्हा खरं म्हणजे त्याची आशा नव्हतीच. तिच्या कडकडाटापुढे तो खाली मान घालून गप्प बसला, माझ्या डोळ्याला डोळा न देता, तेव्हा खरं म्हणजे ती बोलली ते बरोबर असलं पाहिजे अशी माझ्या मनाने कबुली दिली होती. तरीही मी काही दिवस त्याची वाट पहात राहिले. त्यानं अनेक बायकांना झुलवलं त्यातली मी एक हे मानणं जड जात होतं. कुणी इतकं दुतोंड असतं? आम्ही एकत्र असतानाचं त्याचं बोलणं, वागणं सगळंच

अवन्तिका - ५७