पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचं पारायण करीत असे. तो पेंटिंग करताना बघत बसायला मला आवडायचं. आराखड्यापासून चित्र तयार होईपर्यंतच्या सर्व क्रिया मला जादूभरल्या वाटायच्या. तो कधीतरी मला मॉडेल म्हणून घेईल किंवा निदान माझं एखादं लहानसं चित्र काढील असं स्वप्न मी बाळगून होते. त्याच्या चित्रांत एक तऱ्हेचं निळं-करडं गूढ वातावरण, धूसर आणि बिनचेहऱ्याची माणसं असत. एकदा मी त्याला विचारलं, "आपल्या डोळ्यांना दिसतं तसं तू का चितारीत नाहीस ?" तेव्हा खूप हसून तो मला म्हणाला, "माझ्या डोळ्यांना दिसतं तसंच मी काढतो." वयातल्या फरकाचा त्याला काही विधिनिषेध नव्हता, पण मला वाटतं मी लहान मुलगी ह्या सदरात मोडत असताना त्याची माझी गाठ पडल्यामुळे तो मला सदैव लहान मुलगीच समजत राहिला. मोठी झाल्यावर कधीकधी मी मुद्दाम नखरा करून त्याच्यासमोर जायची, पण तो नेहमीच्याच मोकळेपणाने "हॅलो ब्यूटिफुल" किंवा "कुणाच्या लग्नाला गेली होतीस ?" असं म्हणायचा. "अरे, हे सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ?" असा भाव त्याच्या आवाजातही नसे आणि चेहऱ्यावरही नसे. त्याच्यासमोर फक्त एक अतिपरिचित छोटी मुलगी असे. तिची तरुणी झालेली त्याच्या कधी लक्षातच आली नाही.
 प्रेमभंगाचं दुःख पचवता पचवता कधीतरी मी प्रेमाबाहेर पडले आणि मग ज्या त्याच्या रूपाने मला मोहवलं होतं ते..... गोरा रंग, उंच सडपातळ बांधा, धरधरीत नाक, पातळ जिवणी ..... मला बायकी वाटायला लागलं. त्याचं स्वतःच्या पोशाखात फारच रस घेणं, अति आदबशीर वागणं, एवढंच काय त्याचे साहेबी थाटाचे इंग्रजी उच्चार ह्या सगळ्यात मला काहीतरी खोटं, कृत्रिम दिसायला लागलं. त्यानं थोडंफार नाव मिळवलं तरी त्याची कला समीक्षकांनी विशेष उचलून धरली नाही, आणि त्यानं खरडलेल्या चार-दोन कविता छापणाऱ्या मासिकाचा संपादक त्याचा मित्र होता हे कळलं तेव्हा त्याही बाबतीत माझा भ्रमनिरास झाला. मग त्याच्याविषयीचं माझं स्वप्नरंजन आठवून मी किती मूर्ख होते असं मला वाटायला लागलं.

उज्ज्वला - २१