पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तपकिरी शिसवीचं फर्निचर, खरेखुरे पर्शियन गालिचे, देशा-परदेशातून कुणी कुणी आणलेल्या कलात्मक वस्तू, भिंतीवर लावलेली चित्रं (त्यातली काही रुस्तुमची होती हे मला नंतर कळलं) सगळ्याच गोष्टींचं मला आकर्षण वाटे.
 आम्ही ज्या इमारतीत राहत होतो, तिच्या जागेवर पूर्वी फ्रेनीच्या कुटुंबाचं घर होतं. ते फ्रेनीचे वडील, त्यांचा भाऊ आणि बहीण ह्या तिघांच्या समाईक मालकीचं होतं. तिचे वडील वारल्यावर काही वर्षांनी घर विकायचं ठरलं. एक तर एवढ्या मोठ्या घराची आता गरज नव्हती. सुरुवातीला त्यांच्याबरोबर राहणारा चुलता आता हैदराबादला स्थायिक झाला होता. आत्या मरून गेली होती. आणि तिची एकुलती एक मुलगी लग्न करून गेली होती. तिचाही वडिलोपार्जित घरात वाटा होताच. घर आता इतकं जुनाट झालं होतं की त्याची डागडुजी करायची म्हणजे फ्रेनीच्या आईला दिवाळंच काढावं लागलं असतं. शिवाय घरावर हक्क सांगणारे दोघे दुरुस्तीच्या खर्चाचा वाटा उचलायला तयार नव्हते. शेवटी एका बिल्डरला घर विकून त्याचे पैसे घेण्याचं त्या दोघांनी मान्य केलं. फ्रेनीच्या आईला काही पैसे आणि एक फ्लॅट मिळाला. फ्लॅट तसा लहान होता असं नाही, पण त्यातली एक मोठी खोली म्हणजे रुस्तुमचा स्टुडिओ होता. एकदा मी फ्रेनीला विचारलं, "रुस्तुमचं लग्न झालं, त्याला मुलं झाली म्हणजे ही जागा तुम्हाला अपुरी नाही का पडणार ?" ती म्हणाली, "तो लग्न करील तेव्हा बघू." ह्यावेळी फ्रेनी अजून तिशीतच होती. शिवाय ती वयाने रुस्तुमपेक्षा लहान होती, पण तरी ती लग्न करून ह्या कुटुंबातनं बाहेर जाईल अशी शक्यताही माझ्या डोक्यात आली नव्हती.
 रुस्तुम चित्रकार आहे, कविता करतो ह्या गोष्टींनी मी खूप प्रभावित झाले होते. त्याच्या रूपाचा, वागण्याचा सगळ्याचाच मला मोह पडला होता. त्याच्या दोन-चार कविता दर्पण नावाच्या एका अत्यंत अप्रसिद्ध मासिकात छापून आल्या होत्या. त्या वाचायला नेऊन मी आपल्या वहीत उतरून घेतल्या होत्या, आणि मधूनमधून

२० - ॲलिस