पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणि तरीही ह्या सगळ्याच्या पलिकडे एक रुस्तुम आहे ह्याची मला जाणीव होती. उमद्या स्वभावाचा. कुणाला न दुखवणारा. "समीक्षकांचं काही मनावर घ्यायचं नसतं. ते ठरवूनच एखाद्याला डोक्यावर घेतात, दुसऱ्याला खाली खेचतात," असं फ्रेनी म्हणाल्यावर गोडसं हसून तिला पाठीवर थोपटणारा पण तिच्याशी सहमती न दाखवणारा.
 एकदा कधीतरी रुस्तुमचं लग्न झाल्यानंतर माझी आई मला म्हणाली, "तुला माहीताय उज्ज्वल तुझी फ्रेनी मला एक दिवस भेटायला आली होती. म्हणाली, "तुमची मुलगी फार लहान आहे,अननुभवी आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला सावध करायला आलेय. रुस्तुम तिच्याशी खूप मोकळेपणानं वागतो. पण तो सगळ्यांशीच तसं वागतो. विशेषत: बायकांशी. ती कधीही आली की, हॅलो ब्यूटिफुल म्हणून तिला हाक मारतो. ती काही म्हणाली की, अगदी लक्षपूर्वक ऐकतो. खरं म्हणजे असल्या गोष्टींना काही अर्थ नसतो, पण तुमची मुलगी जरा वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. तिनं अशा वागण्याचा चुकीचा अर्थ लावू नये." मी विचारलं, "मग तू काय म्हणालीस ?"
 "मला तिचा रागच आला होता. भोचक मेली. मी म्हटलं, माझी उज्ज्वल लहान असेल, पण शहाणी आहे. तिच्याबद्दल तुम्हा काही काळजी करू नका."
 मी नुसतीच हसले.
 आई 'तुझी फ्रेनी' म्हणाली ते बरोबर होतं. वयात फरक असला तरी तिची माझी चांगली मैत्री जमली होती. तिचा रोखठोक स्वभाव, प्रसंगी तिखट बोलणं मला आवडायचं. ती जराशी खत्रुड असली तरी मुळात दिलदार होती आणि कुणाशी मतभेद असले तरी ती मनात काही कडूपणा ठेवीत नसे. त्यामुळे तिच्या ॲलिसशी वागण्याचा मला जास्त धक्का बसला. नणंद-भावजय हे नातंच शत्रुत्वाचं असलं तरी फ्रेनीसारख्या शिकलेल्या, सुसंस्कृत बाईनं इतकं तोल सोडून वागावं हे मला खटकायला लागलं. ॲलिस

२२ - ॲलिस