पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ९ वा.


अहल्याबाई आणि तुकोजी होळकर.


 मागील भागांन सांगितल्याप्रमाणे खजील झालेले श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबादादा पुण्याकडे चालते झाले. मागून अहल्याबाईच्या आज्ञेप्रमाणे तुकोजी होळकरही आपल्या लवाजम्यानिशी पुण्यास गेला. तेथे श्रीमंत माधवराव पेशवे यांस भेटून व रीतीप्रमाणे नजराणा देऊन त्यांजकडून त्याने आपणास होळकराच्या गादीच्या मालकीची वस्त्रे संपादन केली. तो निघाला त्या वेळी बाईने आपले खाजगीकडील शिवबा बाजी व नारो गोपाळ हे दोघे हुशार कारकून त्याजबरोबर पाठविले होते. त्यापैकी नारो गोपाळ यास श्रीमंतांनी त्याचे कारभारी नेमिले व शिवबा बाजी मोठा हुशार व कर्ता पुरुष आहे असे त्यांस वाटल्यावरून त्यांनी तुकोजीच्या अनुमताने त्यास आपल्याच पदरी निरंतर ठेवून घेतले.

  त्यानंतर श्रीमंतांची आज्ञा घेऊन तुकोजी आपल्या कारभाऱ्यासह महेश्वरी येऊन बाईस भेटला व तिच्या आज्ञेने अधिकार चालविण्यासाठी इंदुरास येऊन राहिला. त्याने मल्हाररावांच्या मरणाने व मालीरावाच्या व्रात्यपणाच्या राज्यपद्धतीने होळकरांच्या प्रजेंत जें असमाधान झाले होते ते आपल्या अंगच्या सद्गुणांनी लवकरच नाहीसे करून व सुभेदारांच्या