पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[८९]

घेतों, ह्मणजे ती वाचून आमच्या चरित्रनायिकेच्या अंगी वरील सर्वोत्तम सद्गुणांशिवाय प्रसंगोचित चातुर्यही होते अशी खातरी आल्यावांचून राहणार नाही. श्रीमंत दादासाहेब हे महेश्वरी असतां अहल्याबाईनें आपला वर्तनक्रम पूर्वीप्रमाणेच ठेविलेला होता. नित्य हजारों रुपये ती दानधर्मात खर्च करीत असे, आणि त्याकरितां कोट्यावधि रुपये तिनें निराळे काढून ठेविलेले होते. त्या तिच्या द्रव्याचा श्रीमंत दादासाहेबांस अभिलाष उत्पन्न होऊन त्यापैकी बरीच मोठी रक्कम त्यांणी आपणांस हिंदुस्थानांत स्वारी करण्यास जाणे आहे तिच्या खर्चाकरितां उसनवार ह्मणून द्यावी असें अहल्याबाईपाशी बोलणे लाविले. पण त्यावर तिने त्यांस चोख असे उत्तर दिले की, ही माझी सर्व दौलत मी दानधर्माकडे योजून तीवर तुळशीपत्र व पाणी सोडून निराळी ठेविली आहे. आपली इच्छा असल्यास आपण दक्षिणा घेण्यास तयार व्हावे, म्हणजे आपण मागतां तेवढी रक्कम मी गोप्रदान ह्मणून आपणास देईन. हे तिचे बोलणे अर्थातच दादासाहेबांस कबूल न होऊन त्यांनी सक्तीने तेवढी रक्कम देण्यास सांगितले. पण त्यावरही तिने एकच जबाब दिला की, माझा कृतसंकल्प मी कधीं मोडणार नाही. आपणास दाक्षिणा देते ती घ्यावी, नाही तर मजबरोबर लढाई करून मला जिंकून ती प्राप्त करून घ्यावी. अहल्याबाईच्या या भाषणाने दादासाहेबांस फार चीड येऊन त्यांनी तिजबरोबर लढाई करण्याचा विचार केला.

 या वेळी अहल्याबाईनें पूर्वीप्रमाणे मदतीकरितां कोणास पत्रे पाठविली नाहीत.फार काय सांगावें? इंदुरास तुकोजीराव होता त्यास देखील तिने आपला बेत न कळवितां कांहीं युक्ति यो-