पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८८]
भाग आठवा.


 या वेळी अहल्याबाई महेश्वरास होती. पुण्यास जाण्याविषयी दादासाहेबांनी तेथून तिचा निरोप मागविला असतां तिने त्यांस महेश्वरी येऊन आपणास भेटून जाण्याविषयी विनंति केली; त्याप्रमाणे दादासाहेब महेश्वरी गेल्यावर दोघांची सेव्यसेवकाच्या नात्याने पुष्कळ वेळां बोलणी झाली.मग तेथें आठ दिवस मुक्काम करून ते दक्षिणेत जाण्यास निघाले. नंतर तिने एक पलटण बरोबर घेऊन पुण्यास जाऊन खुद्द श्रीमंत माधवराव पेशवे यांजकडून गादीची वस्त्रे घेण्याविषयी तुकोजीस आज्ञा केली.

 याप्रमाणे होळकरांच्या घराण्यावर जो अनिष्टकारक प्रसंग त्या वेळी घडून यावयाचा होता तो टळून त्याचा शेवट असा गोड झाला हे पाहून कोणास आनंद होणार नाही ? पण असा आनंददायक परिणाम कां झाला बरें ? याचे मूळकारण पाहूं गेले तर, आमच्या चरित्रनायिकेच्या अंगी असलेले पातिव्रत्य, भूतदया,स्वाभिमान व प्रसंगावधान इत्यादि लोकोत्तर गुण हेच होय असे कळून येईल; नाही तर अहल्याबाई ह्मणजे एक अनाथ स्त्री होती. राघोबादादास तिचा फडशा पाडण्यास किती वेळ लागला असता ? पण वरील सद्गुणांच्या जोरावर प्रथम केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवून तिने कंबर बांधिली व त्याच परमेश्वराने तिला यश देऊन तिचे हेतु सफल केले. व दादासाहेबांचे काही चालू दिले नाही. तात्पर्य, खऱ्या सद्गुणापुढे कसले जरी शौर्य असले तरी त्याचे तेज कधीं पडावयाचें नाहीं.

 या वेळी दुसरी एक विलक्षण गोष्ट घडलेली बखरीत सांगितली आहे ती आमच्या वाचकांकरितां आम्ही येथे उतरून