पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[ ८७ ]


वाचा मनुष्य होता. व ह्मणूनचा सुभेदारांच्या हाताखाली इतक्या योग्यतेस चढला होता. पण या वेळी त्यास दुर्दैवाने घेरल्यामुळे तो विपरीत मसलत करून अहल्याबाई सारख्या साध्वीच्या प्रेमास व पुढे प्राप्त होणाऱ्या नांवलौकिकास सर्वस्वीं आंचवला ! होळकर आणि श्रीमंत पेशवे या दोन्ही घराण्यांत होणाऱ्या कलहाचा सुदैवाने सामोपचाराने शेवट लागल्यावर अहल्याबाईच्या मदतीकरितां भोंसले, गायकवाड वगैरे सरदारांनी आपली सैन्ये पाठविली होती ह्या त्यांच्या उपकाराबद्दल अहल्याबाईने त्यांतील सर्व लोकांस मोठी मेजवानी देऊन त्यांच्या योग्यतेप्रमाणे कोणास कंठी, कोणास चौकडे, वगैरे बक्षीस देऊन त्यांचा योग्य गौरव केला व वेळेवर आपली मदत मला मिळाल्याने माझा सर्वतोपरी बचाव झाला, मी आपली फार आभारी आहे अशी त्यांच्या सेनानायकांजवळ कृतज्ञता दर्शवून त्यांस जाण्यास परवानगी दिली. त्यांनीही स्वस्थानी गेल्यावर बाईच्या उदार स्वभावाची व विलक्षण इभ्रतीची आपल्या यजमानांजवळ तारीफ केली.

 श्रीमंत दादासाहेब पेशवे हे एकमास पर्यंत अहल्याबाईचे पाहुणे होऊन इंदुरास राहिले होते, तितक्या अवकाशांत त्यांनी बारीक रीतीने बाईविषयी सर्व प्रजाजनांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न केला; तेव्हां त्यांस पूर्णपणे कळून चुकले की, सर्व प्रजा अहल्याबाईस केवळ देवाप्रमाणे मान देत आहे; यासाठी तिनशीं वैर संपादन केले असतां तिच्या तेजापुढे आपले तेज पडणार नाहीं; इतकेच नाही तर त्या योगाने सर्व लोकांचे शाप मात्र आपणास घेणे भाग पडेल. असा विचार करून तेथून त्यांनी मुकाट्याने पाय काढण्याचा विचार केला.