पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८२]
भाग आठवा.


आहे ह्मणूनच जगांत ती अलौकिक ठरून तिची सर्वतोमुखीं प्रशंसा होत आहे.

 अहल्याबाईचे आपल्या नौकरचाकरांशी कसे वर्तन होते हे मागे सांगण्यांत आलेच आहे; त्याच प्रकारचे तिचे वर्तन तिच्या सैन्यांतील लोकांशी असे. मल्हाररावांच्या मरणानंतर त्यांना अनेक वेळां बक्षिसे देऊन व त्यांच्या शौर्याची तारीफ करून तिने त्यांस संतुष्ट ठेविले होते; त्यामुळे तिचा हुकूम होतांच ते सर्व लढाईला तयार झाले. तशांत आपली घनीण जातीने युद्ध करण्यास येणार असे समजतांच तर त्यांना विशेष आनंद होऊन मरेपर्यंत युद्धांत तिला आपली कर्तबगारी दाखविण्याचा त्यांनी उत्साह प्रकट केला. याप्रमाणे आपली लढाईची सर्व तयारी केल्यावर तिने राघोबादादांस असा निरोप सांगून पाठविला की, तुह्मी अन्यायाच्या मसलतीस अनुकूल होऊन स्त्रीवर चालून येत आहां हे काही चांगले करीत नाही. मी तर बोलून चालून स्त्री आहे. आपणासारख्या रणधुरंधरांनी लढाईत माझा पराजय केला तरी त्यांत आपली कीर्ति वाढेल असे समजू नका; पण यदाकदाचित् दुर्दैवाने माझ्या हातून तुमचा पराजय झाला तर या जगांत कोणास तोंड दाखविण्यास आपणास जागा राहाणार नाही, या गोष्टीचा पुरता विचार करून काय करणे ते करा.

 अहल्याबाईने पाठविलेला सांडणीस्वार उदेपुरास जाऊन पोचतांच तिने दिलेले पत्र त्यांने तुकोजीरावास दिले. ते वाचतांक्षणींच