पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[८१ ]


श्रीमंत दादासाहेब आमच्या हरामखोर दिवाणाच्या मसलतीला लागून या गरीब अबलेला कोपऱ्यांत बसवू पहातात, तर तसे त्यांस न करण्याविषयी धाकट्या श्रीमंताकडून सांगवून या पदरच्या स्त्रीची अब्रू आणि भाकरी निरंतर चालेल अशी बाईसाहेब तजवीज करतील तर तिजवर होणारे उपकार कधीही फिटले जाणार नाहीत.

आपली अनाथ झालेली

आश्रित

अहल्या."

 ठरल्याप्रमाणे रघुनाथरावांची स्वारी सैन्यासुद्धां इंदुरापासून बारा कोसांच्या अंतरावर येऊन थडकली. हे वर्तमान अहल्याबाईस कळताच तिने आपले धैर्य किंचितही कमी होऊ न देतां आपल्या पदरच्या लोकांस व सैन्यास आज्ञा केली की, तुमची सर्व तयारी असू द्या व माझ्या लाडक्या हत्तीवर हौद्याच्या चारी कोनास तिरांनी भरलेले भाते बांधा. त्या हरामखोर पेशव्याशी मी जातीने लढून त्यास मल्हाररावांच्या सुनेची करामत दाखविणार आहे. खरोखरच आमच्या चरित्रनायिकेने या वेळी आपल्या सैन्यास उत्तेजन देऊन स्वतः युद्ध करण्याचा विचार केला होता. जात्या स्त्री असून जन्मापासून युद्धकलेचे किंचित् देखील शिक्षण नसतां राघोबादादासारख्या शूर सरदाराशी लढाई करण्यास ती तयार होते ही किती विलक्षण गोष्ट आहे ! पण अशी विलक्षण गोष्ट तिजकडून घडली