पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[७९]


नाही तर आपले शरीर तरवारीला खर्ची घातले आहे. आम्ही आपले ताबेदार. वडिलांप्रमाणे चाकरी घेतल्यास हजर राहूं आणि धुणींपाणी सरली असल्यास मोंगलांची करूं अथवा फिरंग्यांची करूं अथवा काय पाहिजे तें करूं, पण ब्राह्मणास दौलतीचा अभिलाष करूं देणार नाही.' इतकें बोलून त्या दोघांस भोंसले, गायकवाड वगैरे मल्हाररावांचे जे दोस्त राजे होते त्यांस सांडणीस्वाराबरोबर अशा आशयाची पत्रे पाठविण्यास सांगितले की, कैलासवासी सुभेदार यांनी श्रीमंतांचे दौलतीचा पाया खोदून आपल्या हाताने वीट टाकून वर इमारत उभारली हें तुह्मांस माहित आहेच. त्यांच्या पश्चात् आह्मी दुःखांत चूर झालेलों असतां आमची दौलत रक्षण करून आम्हांकडून सेवांचाकरी करवून घेण्याचे एकीकडे ठेवून उलट आमच्या दौलतीविषयी अभिलाष धरिला आहे तर आमच्या मदतीस सर्वांनी फौज पाठवावी. नाहींपेक्षां आमच्या प्रारब्धी असेल तसें भोगू; पण आज आम्हांवर प्रसंग आला तो उद्यां तुह्मांवर येण्यास चुकणार नाही हे पक्कें लक्षात ठेवावें. इतकें सांगून व सर्व मसलत गुप्त ठेवण्याविषयी बजावून त्यास जाण्याविषयी आज्ञा दिली.

 मालीरावाच्या मरणाच्या अगोदरपासून तुकोजी होळकर हा उदेपुरांत कांहीं राजकारस्थानांत गुंतलेला होता व तो अद्यापि तिकडेच होता. त्याचे या वेळी येथे येणें अवश्य आहे असे अहल्याबाईस वाटून तिने ताबडतोब सांडणीस्वाराच्या हाती सर्व मजकुराचे पत्र त्यास पाठवून त्यांत फौजेसह जेवीत असल्यास पाणी प्यावयास इकडे यावे असे लिहिले.

 आपण योजिलेली कपटाची मसलत सिद्धीस न जातां भलत्याच