पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७८]
भाग आठवा.


आपण उपकार केलेले असतात ते कृतघ्न होतात. अहल्याबाई ह्मटली ह्मणजे एका गरीब धनगराची कन्या तिचे खंडेरावाशी लग्न करून तिचा भाग्योदय करण्यास जो अंशतः तरी कारणीभूत झाला त्या राघोबाने पतीच्या, सासऱ्याच्या व पुत्राच्या निधनांनी दुःखांत पडलेल्या त्या अनाथ अबलेस सहाय करावयाचे ते सोडून तिला कोपऱ्यांत बसवून सर्वस्वी नागविण्याचा विचार करावा काय? तसेंच ज्यांच्या कृपेनें दिवाण गंगाधर यशवंत एवढ्या महत्पदास पोंचला त्या मल्हाररावांच्या स्नुषेशी त्याने असा कृतघ्नपणा करावा काय ? धिक्कार असो त्यांच्या ह्या नीच विचारास !

 राघोबादादाची ही नीच मसलत अहल्याबाईच्या अगोदर तिच्या नणंदा हरकुबाई व उदाबाई यांस कळली व लागलीच त्यांनी ती अहल्याबाईला कळवून सांगितले 'आतां सावध रहा. ब्राह्मण हरामखोरीस आला आहे; वेळेवर उपाय केल्यास ठीक पडेल, नाहीतर तुला घोड्याचे दाणे भरडावे लागतील व आह्मांस भीक मागावी लागेल.' ही बातमी अहल्याबाईला कळतांच तिच्या सर्वांगाची लाही झाली. व आतां काय करावे असा तिला विचार पडला; पण ती पुऱ्या दृढनिश्चयाची स्त्री होती. काही झाले तरी प्राण जाईपर्यंत आपणाकडून हार व्यावयाची नाही असा संकल्प करून शिवबा बाजी व राजाराम आत्माजी या दोघांस बोलावून आणवून त्यांना ती रागाने ह्मणाली ब्राह्मणानें मेल्याने हरामखोरी आरंभली आहे, तरी ह्मणावे मी बायकोमाणूस आहे असे समजू नका. खांद्यावर बासढा टाकून लढाईला उभी राहिले ह्मणजे श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल. आमचे वडीलांनी माडभवई करून राज्य मिळविले