पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७६]
भाग आठवा.


राज्य चालविण्यापेक्षा आपलाचजवळचा आप्त आपल्या सासऱ्याच्या विश्वासांतला व आपल्याच पराक्रमाने नांवारूपास आलेला असा तुकोजी अहल्याबाईने होळकरांच्या गादीस अधिकारी नेमिला तो कोणा सुज्ञ मनुष्यास योग्य वाटणार नाही ? पण महत्वाकांक्षेनें अंध झालेल्या गंगाधर तात्यास तो कसा पसंत पडणार ? तुकोजी गादीवर बसल्यावर आपल्या दिवाणगिरीवर पाणी सोडणें भाग पडेल की काय अशी त्याला भीति पडली. नंतर त्याने असा विचार केला की, अहल्याबाई ही जात्या स्त्री आहे. हिचे धैर्य ते किती असणार ? तर अगोदर रघुनाथरावांसच अनुकूल करून घेऊन त्यांस येथे आणावे व त्यांजकडून हिला जरब घालून आपण सांगू तसें कबूल करण्यास लावावें. लोभी गंगाधर यशवंताचा हा विचार कायम होऊन त्याने त्याप्रमाणे लागलाच माळव्यांत दादासाहेब होते त्यांकडे खलिता लिहून पाठविला की, मालीरावाच्या मरणाने मल्हाररावांची सर्व दौलत बेवारसी झाली आहे व येथील सर्व प्रजाजन शोकनिमग्न झाले आहेत. तशांत आपणास सुभेदारांच्या चिरंजीवाप्रमाणेच लोक समजतात तर हल्लींच्याप्रसंगी येथे येऊन सर्व राज्य आपल्या ताब्यात घेण्याचे करावें. वेळेवर याल तर सर्व काही होईल.

  सदरहु खलिता गंगाधर यशवंताच्या गुप्त सेवकाहातीं श्रीमंत रघुनारावपेशवे ऊर्फ राघोबादादा यांस मिळाला. यावेळी या शूर पुरुषाच्या पूर्वीच्या व आतांच्या प्रकृतींत महदंतर पडलेले होते. पूर्वी आपला भाऊ पेशवाईच्या गादीवर असतांना ज्याने लक्ष्मणासारखें बंधुप्रेम मनांत ठेवून वारंवार त्याच्या शत्रूशी लढाया मारल्या व त्यांना जेरीस आणून त्याच्या