पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ८ वा.
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

 श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की, 'जगी सर्व सूखी असा कोण आहे.' या ह्मणीचा तात्पर्यार्थ इतकाच घ्यावयाचा की, या जगांत सर्व गोष्टींनी सुख कोणासही मिळावयाचे नाही, असा ईश्वरी संकेत आहे. नाही तर जो एक यःकश्चित् धनगर एका मोठ्या संस्थानाचा अधिपति झाला, ज्यास कोणी कधी पुसतही नव्हते तो श्रीमंत पेशवे सरकारचे केवळ विश्वासस्थान बनला व जो हातांतली गुरे राखण्याची काठी झुगारून देऊन सकल वीरांचा नायक झाला, त्या मल्हाररावाच्या एकुलत्याएक पुत्राचा व नातवाचा अल्पवयांत अंत होऊन त्याच्यावर, पिंड मिळण्याविषयीं दुसऱ्याच्या तोंडाकडे स्वर्गलोकी बसून पाहण्याची पाळी यावी, यापरती अधिक दुःखकारक स्थिति ती कोणती? पण इतक्यानेच निभावून इहलोकी तरी त्याने संपादन केलेले राज्य आमच्या चरित्रनायिकेसारख्या धैर्यवान् व पुण्यवान् स्त्रीच्या हाती ठेवून त्याची वाताहत झाली नाही ही परमेश्वराची मोठीच कृपा समजली पाहिजे. खचित या वेळी आपल्या सासऱ्याचा अभिमान बाळगणारी अहल्याबाई नसती तर त्या वेळेसच होळकरांच्या राज्याची समाप्ति होऊन आजमित्तीस त्याच्या