पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७०]
भाग सातवा.


कसा व्हावा? पिशाचाच्या हाती कोलती' या ह्मणीप्रमाणे त्यामुळे मालीराव अधिकच दहशत घेऊन दुखण्याने पडला व अहोरात्र वाटेल ते बहकू लागला. त्याची ती दुःस्थिति पाहून साध्वी अहल्याबाईच्या दुःखास पारावार नाहींसा झाला. रडून रडून तिच्या डोळ्यांतले सर्व पाणी आटून ते कोरडे पडले. ती नित्य देवाची प्रार्थना करी की, देवा, ही पुत्राची स्थिती बघण्यापेक्षा मला मरण दे. मालीराव लहरीत येऊन त्या बुट्टीवाल्याच्या तोंडचे शब्द बोलूं लागला ह्मणजे त्याच्या अंगांत समंध आला असे समजून ती त्याची हात जोडून प्रार्थना करीत असे, व त्याला ह्मणे की, तूं कृपा करून माझ्या मुलाला सोड. मी तुला एक मोठे देऊळ बांधून देते व मागशील तितकी जमीन इनाम करून देते. पण ते त्याने ऐकिलें नाही. तो ह्मणे की, याने मला अपराधावांचून मारिलें आहे तर मी याचा जीव घेईन. अखेरीस त्या साध्वीचे सर्व उपाय निष्फळ होऊन त्या संबंधाने ह्मणा की, तिच्या दुदैवाने ह्मणा, तिच्या त्या एकुलत्या पुत्राचा शेवट झाला व त्याच्या स्त्रीने त्याबरोबर सहगमन केलें !

 हा अनिवार्य अनर्थ घडून आला तेव्हां त्या माउलीची स्थिति दुःखाने व ममतेने कशी झाली असेल हे सांगितले पाहिजे काय ? पुत्र शूर, शहाणा व सदाचारी असो, अथवा गचाळ, मूर्ख व दुराचारी असो, तो कीर्ति मिळवो की, अपकीर्ति मिळवो, कसे असले तरी मातेचं जन्मापासून मरेपर्यंत त्यावर निष्कृत्रिम प्रेम असते. सर्व सुखांचा दाता जो पति तो ऐन तारुण्यांच्या भरांत गेला. पुढे सासू-