पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुत्रशोक.

[६९]


की, तो मनुष्य मोठा मांत्रिक आहे. - मालीरावास ते कळताक्षणी अत्यंत कोप चढला, व लागलेच शिपायांकडून त्याला पकडून आणवून काही विचार न करितां एकदम ठार मारविले. मारतेवेळी तो जडिबुट्टीवाला त्यास बजावून ह्मणाला की, मला निरपराध्याला मारीत आहेस, पण विचार कर, मी समंध होऊन तुझ्या उरावर बसेन, आणि याचा सूड घेईन. अविचारी मालीरावापुढ़ें या त्याच्या भाषणाचा कांहींच उपयोग झाला नाही.

  पुढे काही दिवसांनी या गोष्टीची चौकशी होतां होता तो खरोखरच निरपराधी होता अशी मालीरावाची खातरी झाली. मग त्याचे अंतकाळचे शब्द त्याला आठवले व आधीच तो वेडा झाला असल्यामुळे, तो समंध होऊन आतां माझा सूड घेणार अशी त्याला दहशत बसली. मग काय विचारावयाचें आहे ! त्याचेच शब्द हा अहोरात्र घोकू लागला, व सारे लोक तो अन्यायाने मारिलेला जडीबुट्टीवाला समंध होऊन त्याला लागला आहे असें ह्मणूं लागले.

 ही दुःखकारक बातमी ऐकून साध्वी अहल्याबाईला किती दुःख झाले असेल बरें ? भूत, पिशाच, समंध, यांवर तिचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोकांनी सागितलेलें खरें असावे अशी तिची खातरी झाली. व त्याचा प्रतिकार करण्याकरितां ती दुसरे मांत्रिक व देवऋषि यांचा शोध करूं लागली. द्रव्यलोभाने पुष्कळ मांत्रिक, देवऋषि आले, व त्यांनी आपणास वाटले ते उपाय केले, पण त्याचा उपयोग