पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६६]
भाग सातवा.


झाली होती. व त्यांत सर्व आयुष्य घालविण्याचा तिचा दृढनिश्चय झाला होता. तिची ब्राह्मणावर अत्यंत भक्ति व पुरा विश्वास असे. त्यांस ती नित्य हजारों गोप्रदाने देऊन संतुष्ट करीत असे, व त्यामुळे तिची चहूंकडे वाहवा होत असे. पण वेड लागलेल्या मालीरावास त्यापासून कसा आनंद व्हावा. त्याने पापबुद्धीने नाहीं तरी, कुचेष्टेने ब्राह्मणांस त्रास देऊन त्यांचे अभिश्राप घेण्यास आरंभ केला. अहल्याबाई ब्राह्मणांस नित्य गोप्रदाने व जोडे दान करीत असे. त्या दानपात्रांत व जोड्यांत हा विंचू घालून वर रुपये मांडून ठेवी आणि ब्राह्मणांस घ्यावयास सांगे. मग त्यांनी त्यांत हात व पाय घातला असता त्यांस विंचू दंश करीत व त्या वेदनेनें ब्राह्मण तडफडूं लागले ह्मणजे हा खदखदां हंसे व आनंदाने टाळ्या वाजवी. या विघ्नसंतोषीपणाने व व्रात्यपणाने मालीरावास जितकें समाधान होई त्याहूनही अधिक दुःख ब्राह्मणांस पूज्य मानणाऱ्या साध्वी अहल्याबाईस होई. 'माझ्या हातून पूर्व जन्मीं असे कोणते खडतर पाप घडले होते कोण जाणे की, त्याबद्दल माझा सूड घेण्याकरितां परमेश्वराने या राक्षसास माझ्या पोटी जन्मास घातलें. आता हा भोग संपणार तरी कधी ? ' असे ती वारंवार ह्मणत असे व त्या ब्राह्मणांची क्षमा मागत असे. मालीराव खरोखरीच वेडा बनला असून त्याच्या व्रात्यपणाचे आचरण जसे इकडे होई तसेंच राज्यकारभारांतही होत असे. एके वेळी मद्यप्राशनाच्या लहरींत ही स्वारी आपल्या चार मित्रमंडळात गप्पा गोष्टी सांगत रंगांत आली असतां काही राजकारणासाठी दिवाण गंगाधरपंत तेथे आला, तेव्हा त्याने आपल्या रंगाचा बेरंग केला असे समजून या होळकर कुलांगाराने रागास चढून