पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६४ ]
भाग सातवा.


आनंदाच्या भागावर नजर ठेवून तो वाचण्याचे श्रम कराल. पण शेवटी तो संपतांच जेव्हां त्याहून अधिक दुःखाचा तिसरा भाग तुमच्या समोर येऊन उभा राहिलेला पहाल, तेव्हा तुमच्या मनाची अगदी विलक्षण स्थिति होऊन त्रासाने तुह्मी पुस्तक फेकून द्याल; अथवा या चरित्रकाराने वारंवार दुःखाच्या हकीकती देऊन चरित्र भरून टाकण्याची शपथच घेतली आहे की काय कोणजाणे, असा त्यावर दोषारोप कराल; हे आह्मी पूर्ण जाणून आहों. पण याविषयी तुह्मीच आपल्या मनाशी विचार करा की. यास आमचा काही उपाय आहे कां ? आमच्या चरित्रनायिकेवर खरोखरच तसे घडून आलेले दुःखाचे प्रसंग आह्मी या चरित्रांतून वगळले तर मग या चरित्राची किंमत ती काय राहिली ? तर परमेश्वराने अनेक प्रकारची दुःखें भोगण्यासच तिला जन्म दिला होता. अथवा अनेक दुःखांच्या भट्टीतून तिची सुवर्णासारखी निर्दोष व सुंदर मूर्ती तावून काढून तिला जगाच्या कष्टमय आणि खडतर कसोटीस पुरे उतरवावयाचे त्याच्या मनांत होतें तें तुह्मांकडून अथवा आह्मांकडून थोडेंच मिथ्या करवणार आहे? असो. अशा विचाराने मनाची एकाग्रता करून आणखी पुढील दुःखाचे प्रसंग वाचण्यास तयार व्हा.

 सुभेदारांचा काळ झाल्यावर श्रीमंत रघुनाथरावदादासाहेबांनी होळकरांच्या गादीची वस्त्रे आमच्या चरित्रनायिकेचा पुत्र मालीराव होळकर यास दिली असे मागच्या भागांत सांगितलेच आहे. तो मालीराव आतां इंदुरांत राहून होळकरांच्या गादीचा उपभोग घेऊ लागला. गादीवर बसण्यापूर्वी तो आपल्या आज्याप्रमाणे व बापाप्रमाणे शूर दिसत होता, व पतीच्या अकालिक