पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ७वा.


पुत्रशोक.


 वाचकहो, तुझांस कधी हिमालयपर्वतासारख्या एकाद्या अति उंच पर्वतावर चढण्याचा प्रसंग आला असल्यास त्यावेळी जशी तुमच्या मनाची स्थिति झाली असेल तशीच साध्वी अहल्याबाईचे चरित्र वाचतांना होत असेल. सपाट भूमीवरून डोंगराची जी उंची दिसते तितकी चढून गेल्यावर त्यावरच्या रम्य स्थळी जाऊन पोचूं अशी आपल्या मनाची खात्री करून तुम्ही मोठ्या झपाट्याने तो अवघड मार्ग चालून जाता; पण लवकरच त्या ठिकाणी असलेला तितक्याच उंचीचा कडा पाहून तुमच्या मनास उदासीनता प्राप्त होते; तथापि हा एवढा कडा चढून गेलों की खचित आपले इच्छित स्थळ आपण जाऊन गाठू अशी खात्री मानून पुनः उत्साहानें तो कडा धापा टाकीत चढून जाता; पण उपयोग काय ! तो संपल्यावर त्याहून भयंकर असा त्या वरचा तिसरा कडा दृष्टीस पडतांच तुह्मी पूर्ण निराश होऊन हातपाय गाळितां. तद्वतच या आमच्या चरित्रांतील एकादा दुःखाचा भाग पाहून हा संपल्यावर पुढे आनंदाचा भाग असेल अशा आशेने तो भराभर संपवाल, पण पुढे दुसरा दुःखाचा भाग पाहतांच तुमचा हिरमोड होईल; तरी पण हा आणखी एवढाच दुःखाचा भाग असेल अशा कल्पनेने पुढील