पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हाररावांचा मृत्यु.

[६१ ]

चालावयास सांगून आपण उत्तरहिंदुस्थानांत श्रीमंत दादासाहेब व शिंदे यांस जाऊन मिळण्याकरितां निघून गेले.

 नंतर बरेच दिवस लहान मोठ्या लढाया झाल्या, त्यांत सुभेदारांस विशेष श्रम झाल्यामुळे त्यांची प्रकृति बिघडून ते अलमपुरास आले. तेथे त्यांच्या कानास ठणका लागून त्याच्या वेदना असह्य झाल्या. पुष्कळ औषधोपचार केले. पण गुण न पडून त्यांस ज्वर येऊ लागला, व त्यांतच त्यांचा अंत झाला. मरतेवेळी त्यांनी तुकोजीचा हात आपल्या नातवाच्या हातांत घालून त्याचे पालन करण्यास सांगितले व अहल्येची मर्जी राखण्याविषयी फार सावधागिरीने राहण्यास सांगितले व तें तुकोजीरावाने त्यांच्या आज्ञेप्रमाणे पाळिलें. याप्रमाणे चाळीस वर्षे ज्याने युद्धांत घालवून आपल्या धन्याचे राज्य व ऐश्वर्य वाढविले, सर्व शत्रूचा नि:पात करून अक्षय्य कीर्ति मिळविली व अनेक लोकांचे कल्याण करून त्यांची प्रीती संपादन केली; जो केवळ एका य:कश्चित धनगराचा मुलगा असून सांप्रत एका मोठ्या संस्थानचा अधिपती झाला, तो मल्हारराव होळकर मृत्युपावल्यामुळे सर्व सरदारास व विशेषे करून दादासाहेबांस फार वाईट वाटले. सर्व सरदारांत वडील हाच होता व त्या नात्यानें तो सर्वास दोन विचाराच्या गोष्टी सांगत असे. खुद्द श्रीमंतांच्या घरांतील सर्व माणसे त्यास परका असे न लेखतां आपल्या कुटुंबांतीलच समजत व तदनुसार त्याचा सन्मान ठेवीत. असो. दादासाहेबांनी सुभेदार वारल्यानंतर इंदुरच्या गादीची वस्त्रे लागलीच मालीरावास दिली व तुकोजीरावास त्याचे पालक नेमिले.