पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हाररावांचा मृत्यु.

[५७]


मोठ्या सन्मानाने त्यांस त्यांच्या कुटुंबांत पोचतें केलें. आम्हां दक्षिणेतील लोकांस या साध्वीच्या उदार स्वभावाची प्रथम जी ओळख झाली ती याच वेळी होय, व ती उत्तरोत्तर तशीच वाढत गेली. त्यांच्या मनांत तिजविषयींची कृतज्ञता राहिली यांत नवल नाही; पण तिच्या पुण्याईनें त्यांच्या वंशजांच्याही मनांत अद्यापि ती कायम राहिली आहे. पानिपतास पराभव झाल्यावर मल्हारराव इंदुरास न जातां आपल्या धन्याचे शांतवन करण्याकरितां परभारें पुण्यास गेले. त्यानंतर परत आलेल्या लोकांनी त्यांच्याजवळ त्यांच्या सुनेच्या भूतदयेची वाखाणणी केली त्या योगाने त्यांना आनंद झाला यांत विशेष नाही; पण खुद्द श्रीमंतांस देखील आनंद होऊन त्यांनी तिजविषयी आपली कृतज्ञता भरदरबारांत प्रदर्शित केली. तेव्हां सुभेदारांना जो आनंद झाला, तो पूर्वीच्या किती पटीने तरी अधिक असला पाहिजे बरें ? असो. नंतर याच पराभवाच्या दुःखाने लवकरच श्रीमंत नानासाहेबांचा काळ झाला; तेव्हां मल्हारराव आपल्या मुलखी परत गेले. या वेळी आमच्या चरित्रनायिकेचा मुलगा मालीराव हा बारा वर्षांचा झाला होता, व मुलगी मुक्ताबाई हिला नववें वर्ष लागले होते. दोघेही लग्नाला योग्य झाली होती; तेव्हां त्यांची लग्ने करून आपल्या मातारपणचे शेवटचे सुख पाहण्याचा व अहल्याबाईचें, प्रिय करण्याचा त्यांचा विचार झाला. मग त्यांनी आपल्या योग्यतेनुरूप मालीरावास नवरी व मुक्ताबाईस नवरा पाहून त्यांची लग्ने केली. रीतीप्रमाणे दोन्ही समारंभ मोठ्या थाटाने पार पडले. मालीरावास कोणाची मुलगी केली यासंबंधाने