पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हाररावांचा मृत्यु.

[५५]

येथे पुनरावृत्ति करणे नको; तरी त्या वेळी अहल्याबाईवर सर्व राज्याची व्यवस्था त्यांनी सोपविली असल्यामुळे त्यांना तिकडची काळजी कधीही वाटली नाही. यावरून आमच्या चरित्रनायिकेची योग्यता किती होती याची वाचकांस चांगली ओळख पटणार आहे. आतां तिने ती व्यवस्था कशी राखिली हे तुह्मांस पुढे क्रमाने कळेलच.

 अहल्याबाईचा पहिल्यापासूनच देवाकडे व दानधर्माकडे विशेष कल होता; व तो मल्हाररावांनाही माहीत होता; ह्मणून त्यांनी पानिपतच्या मोहिमेवर जातेवेळी तिच्या जिवास समाधान वाटावे ह्मणून बरीच मोठी खाजगी नेमणूक तिच्या मनास वाटेल त्याप्रमाणे दानधर्माकडे खर्च करण्याकरितां तिला करून दिलेली होती, व त्याप्रमाणेच तिनेही तिचा सत्कार्याकडे व्यय केला. ब्राह्मणांचे ठिकाणी तिची फार श्रद्धा असे. ती नित्य अनेक प्रकारची गोप्रदाने वगैरे देऊन त्यांचे मन संतोषित ठेवीत असे व तेणेकरून आपल्या जीविताचें सार्थक्य झाले असे मानीत असे. शिवाय, इतका जरी तिचा दानधर्माकडे ओढा होता, तरी राज्याचा जो वसूल दिवाण गंगाधर यशवंत तिच्या स्वाधीन करीत असे त्यांतला एक छदामही तिने कधी खर्च केला नाही. दरसालच्या दरसाल सर्व वसूल मल्हारराव ज्या ठिकाणी असत तेथें बिनहरकत पोंचता होत असे, व सरकारी कामाकडे जो खर्च झाला असेल त्याचा खडानखडा हिशोब तिच्या हातचा मांडिलेला त्यांस मिळत असे. तिच्या कारभारांत राज्यांत कोणाची कोणत्याही प्रकारची पैशासंबंधाने किंवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधानें कुरकूर कधी मल्हार-