पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५४]
भाग सहावा.


आपला सर्व विश्वास या प्रिय स्नुषेवर टाकिला. राज्याची सर्व व्यवस्था पाहण्याकरितां दिवाण गंगाधर यशवंत यास नेमून त्याने उत्पन्न झालेला सर्व पैसा तिच्या स्वाधीन करीत जावा व नेहमी तिच्या आज्ञेप्रमाणे चालावें अशी व्यवस्था करून ते निघून गेले.

 मल्हारराव गेले ते कोणत्या मोहिमेवर गेले हे सांगितले असतां आह्मी विषयांतर केले असें वाचकांस वाटेल हे आह्मी जाणून आहों. तथापि कोणी एकादा सरळ मार्गाने वाट चालत असतां त्या वाटेंत मध्येच पूर्वी त्याची कांहीं हानि झालेली असली, तर त्या वेळी कारण नसतां त्या ठिकाणी पोंचतांच जसा पूर्वीचा भयंकर प्रसंग आठवून त्याच्या मनास क्षणभर दुःख झाल्यावांचून राहात नाही, तद्वत् आह्मी आमच्या चरित्रनायिकेचें चरित्र सरळ रीतीने लिहीत असतां ज्या सुमारास आह्मां महाराष्ट्रीयांची भयंकर हानि होऊन जिने वैभवशिखरावर पोंचलेल्या आह्मांस पुनः खाली खोल खाड्यांत ढकलून दिले व खंडेराव यांच्या मरणजन्य दुःखाचें वर जे वर्णन केले त्याच्या लक्षपटीने जरी जिचे दुःख वर्णन केले तरी संपणार नाही, तिची या वेळी आम्हांस कशी स्मृति होणार नाही? वाचकहो! ती हानि ह्मणजे पानिपतच्या लढाईचा भयंकर परिणाम होय, हे तुह्मांस निराळे सांगणे नको. शिवाय त्या वेळी श्रीमंतांच्या सेनानीस कुबुद्धीने घेरून त्यांस पदोपदी या आपल्या एकनिष्ठ सेवकाचा अपमान करण्याची कशी बुद्धि झाली व त्यामुळे सुभेदारांस किती वाईट वाटले वगैरे सर्व हकीकती सुभेदारांच्या चरित्रांत आल्या आहेतच; त्यांची