पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.


 इंदूर संस्थानच्या महाराणी श्रीमंत अहल्याबाईसाहेब होळकर या पुण्यशील स्त्रीचें चरित्र लिहिण्याइतकी योग्यता अंगी नसतां या पुस्तककर्त्याने ते लिहिण्याचे साहस केले आहे याचे कारण तिजविषयी त्याच्या अतःकरणांत असलेली अत्युत्कट पूज्यबुद्धि होय. श्रीमंत बाजीराव बल्लाळ, नानाफडणवीस, महादजी शिंदे, महाराणी लक्ष्मीबाई यांची हल्ली जशी मराठीत स्वतंत्र चरित्र निघाली आहेत तसेंच या थोर स्त्रीचंही असावे; अशी त्याची फार दिवसांपासून इच्छा होती; पण ती पूर्ण करणारा चांगल्या चरित्रकारांपैकी अद्यापि कोणी न निघाल्यामुळे त्यास ते काम स्वतःच्याच अंगावर घेऊन तिजविषयी दोन वेड्या वांकड्या ओळी लिहिणें प्राप्त झालें. महाराणी लक्ष्मीबाईच्या चरित्रकाराकडून जर हे चरित्र लिहिले जाते तर तें यापेक्षा अनेक पटीने चांगले झाले असते यांत संशय नाही. पण ते अद्यापि त्याकडून लिहिले गेले नाही व पुढेही लिहिले जाईल अशी आशा करितां येत नाही. ( कारण महाराणी लक्ष्मीबाईच्या चरित्राच्या प्रस्तावनेत या स्त्रीची माहिती मिळत नाही ह्मणून जे त्याने झटले आहे त्यावरून असे अनुमान करण्यास हरकत नाही. ) यासाठी काय होईल तें होवो आपली इच्छा तृप्त करून घेण्यासाठी हे स्वतःच लिहावे असा त्याचा निश्चय झाला व तदनुरूप आपल्या शक्तीप्रमाणे व माहितीप्रमाणे ते त्याने पूर्ण करून सांप्रत सूज्ञ लोकांपुढे मांडिलें आहे. आतां तें कितपत वठलें आहे हे पाहण्याचे काम सूज्ञ लोकांचे आहे.