पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२]


 या पुण्यशील स्त्रीविषयी मिळावी तितकी माहिती मिळत नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. या पुस्तकांत तिच्या, पूर्व वयाची हकीगत दिली आहे तिला लेखी आधार कोठे या चरित्रकाराच्या आढळण्यांत आला नाही. काही वर्षांपूर्वी त्याचे महेश्वरी जाणे झाले असतां ती हकीगत एका वृद्ध मनुष्याच्या तोंडून त्याने ऐकलेली आहे व अशा थोर स्त्रीविषयीं कोणी खोटे सांगणार नाही असा त्याचा समज आहे ह्मणून ती त्याने या चरित्रांत दिली आहे. तरी त्यासंबंधाची खरी हकीगत हे चरित्र वाचून जर कोणी त्यास कळवील तर तो त्याचा फार आभारी होईल व ती या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तींत अवश्य दाखल करील. आणि तशी साधार माहिती देण्याचा सुप्रसंग यावा ह्मणून या आवृत्तीच्या त्याने अगदीच थोड्या प्रती छापवून काढिल्या आहेत.
 हे पुस्तक तयार करण्याचे कामी डाक्टर गणेश कृष्ण गर्दै एल्. एम्. अन्ड एस आणि रावसाहेब नागेशराव विनायक बापट या विद्वान् व थोर गृहस्थांनी उदारबुद्धीने जी मदत केली त्याप्रमाणेच हे पुस्तक छापवीत असतां त्यांत दुरस्ती करण्याचे कामी रा. रा. विष्णु दाजी गद्रे गव्हन्मेंट डेपोचे माजी हेड क्लार्क यांनी जी काळजी घेतली त्याबद्दल सदरहु चरित्रलेखक त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच हे चरित्र लिहित असतां ज्या ग्रंथकारांच्या पुस्तकांचा त्यास उपयोग झाला त्यांचा ही तो अत्यंत आभारी आहे.
  पुणे तारीख १।८।९५

पुस्तककर्ता .