पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ६ वा.


मल्हाररावांचा मृत्यू .


 खंडेरावाचे उत्तरकार्य आटपल्यावर श्रीमंतांची ही मोहिम तितकीच राहिली. सुभेदार आपल्या सर्व कुटुंबासह इंदुरास येऊन दाखल झाले. पुत्राच्या मरणामुळे या वेळी त्यांच्या मनाला जरी अतिशय उदासीनता आली होती, तरी जात्याच ते मोठे धैर्यशाली व विचारी असल्यामुळे पुत्रमरणाने झालेल्या अनिवार्य शोकाची वारंवार आवृत्ति न करितां बोलल्याप्रमाणे अहल्याबाईसच खंडेरावाच्या ठिकाणी समजून अंगीकारिलेल्या स्वदेशकल्याणाविषयी मोठ्या उत्साहाने हातांत तलवार धरण्याचा पुनः त्यांनी निश्चय केला.

 पण बिचाऱ्या साध्वी अहल्याबाईला तसे थोडेच करतां येण्यासारखे होते! इंदुरास येऊन पोचल्यावर आपल्या वाक्यांत पाय टाकतांच तिला पुनः दुःखाने घेरिलें. ज्या घरी आजपर्यंत लक्ष्मीप्रमाणे ती सौभाग्याने नांदत होती त्याच ठिकाणी आतां वैधव्यस्थितीत काळ्या तोंडाने राहवें लागणार ह्मणून तिला अतिशय दुःख झाले. तसेंच पतीसहवर्तमान ज्या ठिकाणी तिने अनेक प्रकारचे विलास केले तो आरसेमहाल अवलोकन करतांच त्याचे स्वरूप भयंकर दिसून तिच्या हृदयांत वारंवार भडभडून येऊ लागले!