पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५०]
भाग पांचवा.


अहल्येची स्थिति भांबावल्यासारखी झाली. आता जगावें तर पतिव्रताधर्माचे चीज करून घेण्याची आलेली अमूल्य संधी पुनः येणार नाही, व मरावें तर आपणाकरितां एका सबंध राजकुटुंबाचा घात केल्याचे पातक आपल्या माथीं बसणार; कारण सुभेदारांनी मटल्याप्रमाणे केल्यावर आपली सासूही मागे आपली हीच वाट करून घेणार. मग माझ्या तान्ह्या मुलांची कोण काळजी करितो ? जिवंत राहिले तर शुद्धाचरणानेही पातिव्रत्याचे चीज करितां येईल; पण इतक्यांची हत्या नको. असा दूरवर आणि पोक्त विचार करून तिने सासऱ्याच्या इच्छेचा आदर केला.

 नंतर रीतीप्रमाणे सुभेदारांनी खंडेरावाच्या प्रेतास अग्नि देऊन त्या दुःखाच्या दिवसाचा शेवट केला; व प्रिय पुत्राचे काही तरी स्मारक या जगांत असावे अशा हेतूने जेथे खंडेरावास दहन केले तेथे एक भव्य छत्री उभारून तिच्या खर्चाकरितां कांहीं गांव इनाम करून दिले, ते अद्यापि तसेच निर्वेधपणे चालू आहेत.

 खंडेरावाचा अल्पवयांत झालेला मृत्यु त्याच्या कुटुंबासच काय पण आपणां सर्व महाराष्ट्रीयांसही अत्यंत हानिकारक झाला असे म्हटले पाहिजे. सुदैवाने तो आणखी काही वर्षे जगांत असता तर खचित आपल्या पित्याप्रमाणे नांवलौकिक संपादून या भरतभूमीचे कल्याण करता, व त्याच्या लहानपणांतल्या उमेदावरून आपणांस अशी कल्पना करणेही अयोग्य होणार नाही. पण तिचा आतां उपयोग काय? परमेश्वराची तशी इच्छा नव्हती.