पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ४८ ]
भाग पांचवा.


तशांत आणखी सुरजमल्लास तिने दिलेले शाप ऐकून त्यांना जो अपरिहार्य संताप झाला त्याच्या आवेशांत अभिमन्युबाळाच्या मरणाने कुपित झालेल्या अर्जुनाने जशी जयद्रथास मारण्याची प्रतिज्ञा केली तशी भयंकर शपथ त्यांनी घेतली ते मोठ्या आवेशाने ह्मणाले 'माझ्या मुलाच्या मरणास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कारण झालेला जो दुष्ट सुरजमल्ल त्याचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुनानदीत फेकून देईन तरच मी मनुष्ययोनीत जन्मास आल्याचे सार्थक केले !'

 साध्वी अहल्येच्या शोकाचे यापुढे अधिक वर्णन करण्यास आमची लेखणी चालत नाही. बराच वेळ झाल्यावर आतां दुर्दैवाने प्राप्त झालेल्या प्रसंगाच्या पुढल्या तजविजीला लागले पाहिजे असा सर्वांनी विचार करून दुःख किंचित् कमी करण्यास अहल्याबाईस विनंति केली, व तीही आपण शुद्धीवर आल्यासारखें दाखवून सर्वास ह्मणाली की, परमेश्वराच्या इच्छेस जें आले त्याला दोष देण्याची कोणाची प्राज्ञा आहे? असो. तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे हा मी सर्व शोक गिळून टाकला. आतां माझ्या धर्माप्रमाणे मला आपली पुढली व्यवस्था करण्याकरितां तुमची आज्ञा व्हावी. मी तुमची सर्वांची धर्माची कन्या आहे. मजवर आजपर्यंत जसा लोभ ठेविलात तसा पुढेही ठेवा. मी आतां आपल्या पतीच्या शवाबरोबर सहगमन करणार. असे त्यांस ह्मणून ती सासूसासऱ्यांपाशी आली व त्यांच्याजवळ आपल्या दोन्ही मुलांना देऊन 'इहलोकी नाही तर नाही, पण स्वर्गलोकीं तरी पतीशी माझा चिरकाल योग घडण्याविषयी आपला आशीर्वाद असावा, ' असे ह्मणून तिने त्यांच्या पायांवर डोके ठेविलें.