पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.

[४७]

हेच केवळ त्यांचे मुख, त्यांचे दैवत, त्यांचे समाधान, फार काय, तोच त्यांचे जीवीत. त्याचा अंत झाल्यावर कोणत्या स्त्रीला, तशांत अहल्याबाईसारख्या पतिव्रतेला त्यावेळी कोणाच्याने दोन गोष्टी सांगून तिचे दुःख कमी करवेल! तिच्या अंगावर कोसळून पडलेलें आकाश दूर लोटून कोणाला तिची सुटका करता येईल ! अरेरे ! असा प्रसंग एकाद्या वैऱ्याच्या स्त्रीवर यावा असे देखील कधी कोणास वाटणार नाहीं ! काय करावें ! कोणी चतुर पुरुष या साध्वीवर एकादी कादंबरी किंवा नाटक लिहूं इच्छील तर, ऐन तारुण्याच्या भरांत तिजवर आलेल्या या दुःसह प्रसंगाचे वर्णन करणे त्यास कष्टतर वाटून तो आपल्या 'निरंकुशाः कवयः ' या न्यायाने तिच्या पतीस जिवंत करून वाचकांच्या चित्तास समाधान देईल; निदान हा प्रसंग पुढे काहींसा लांबणीवर तरी टाकून वेळ मारून नेईल. पण आम्हा चरित्रकारांस तसे करता येणे अशक्य आहे ! 'भवितव्यता बलीयसी' याच महाजनांच्या उक्तीची या प्रसंगी आह्मी आपल्या वाचकांस आठवण करून देतो.

  अहल्याबाईचा हृदयविदारण करणारा पतीविषयींचा आकांत सारखा चालू होता, व तो सर्व सरदार लोक ऐकत होते; पण तिचे शांतवन होण्याकरितां तिच्याशी दोन शब्द बोलण्याचे धैर्य कोणासच होईना. त्यांनी सुभेदारांस तसे करण्याविषयी प्रार्थना केली; पण तिचा तरी उपयोग काय होणार ? अहल्याबाईचा तो अनिवार शोक पाहून खंडेरावाच्या मरणापेक्षाही त्यांना अधिक दुःख झाले व त्यांच्या पोटांत भडभडून आले !