पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४४]
भाग पांचवा.


सौभाग्यमंदिराचा नाश करणारा विद्युल्लतेचा गोळाच काय, अथवा तिचा प्राण हरण करणारा प्रत्यक्ष कृतांतच काय, असा एक तोफेचा गोळा मोठ्या वेगाने सूसू करीत शत्रूच्या सैन्यांतून अकस्मात् येऊन खंडेरावांच्या अंगावर धाडदिशी पडला! मग काय, तोफेचा गोळाच तो! त्याच्या तडाक्यांत सांपडल्यावर मोठमोठ्या पर्वतांच्या कड्यांचा देखील सहज चूर होतो; तर मनुष्यप्राण्याचा कसा बचाव होणार ! खंडेरावांस तो लागतांक्षणीच ते एकदम धाडकन् जमीनीवर पडले. या वेळी त्यांचे अंग भाजून निघाले होते. इतक्यांत सेवकांनी हा अनर्थ घडलेला पाहून लागलेच त्यांना उचलून छावणीत आणिलें व लवकरच तेथे सर्व सरदारलोक जमून त्यांनी औषधोपचार करण्यास सुरुवात केली. पण भवितव्यतेशी झगडून काय उपयोग ! त्या गोळ्याचा वज्रप्राय मारा दुःसह होऊन आमच्या चरित्रनायिकेच्या सौख्याचा जणूं काय गाभाच अशा खंडेरावमहाराजांचा अंत झाला. ! !

 शिवशिव ! या इहलोकची वसती किती अशाश्वत आणि अनिश्चित आहे! आपल्या सर्व महत्वाकांक्षा व त्या सफल होण्याकरितां योजलेल्या मसलती, तसेंच आपलें ऐश्वर्य, आपला मोठा अधिकार, आपल्यावर प्रेम करणारे आईबाप व इतर मित्र, आणखी आपल्या सुखदुःखाची वांटेकरीण होणारी स्त्री, या सर्वांचा एकदम त्याग करून जाणे भाग पडावे ह्मणजे त्या बिचाऱ्या प्राण्याला किती वाईट वाटत असेल! पण तसे वाटून काय उपयोग ! ते टाळण्याचे थोडेंच परमेश्वराने आपल्या हाती ठेविलें आहे !

 ज्या पुत्रास आपण जन्म दिला, व लालनपालन करून