पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.

[४१ ]


टाकिले होते. शिंदे, होळकर, वगैरे रणधुरंधर त्यांचे आज्ञांकित होते. शिवाय जवळ पुष्कळ फौज असून खजिना भरलेला होता. सारांश त्यांस कोणत्याही गोष्टीची न्यूनता ह्मणून राहिली नव्हती.

 अशा वेळी सर्व फौज रिकामी बसून खर्च खात पडली आहे हे बरे नव्हे, ह्मणून तीस उत्तरहिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांपासून खंडणी वसूल करण्यास पाठवावे असा श्रीमंतांनी विचार करून आपले बंधु रघुनाथरावदादासाहेब यांस साठ हजार सैन्य बरोबर देऊन मुलुखगिरीवर रवाना केलें, व शिंदे, होळकर वगैरे आपल्या शूर व एकनिष्ठ सेवकांना त्यांच्या बरोबर जाण्यासाठी हिंदुस्थानांत त्यांस मिळण्याविषयी आज्ञापत्रे लिहिली.

 श्रीरामचंद्राची आज्ञा मान्य करण्यास मारुती जसा एकापायावर तयार असे त्याप्रमाणे आपले धनी श्रीमंत पेशवे यांचा हुकूम पाळण्यास तत्पर असणाऱ्या सुभेदारांनी आज्ञापत्र वाचतांक्षणींच सैन्यासह दादासाहेबांस जाऊन मिळण्याची तयारी केली, व ही मोहिम केवळ खंडणी वसूल करण्याकरतांच असल्यामुळे व हीत रक्तपात विशेष होण्याची भीति नसल्यामुळे त्यांनी आपले चिरंजीव खंडेराव होळकर यांस आणि कुटुंबांतील सर्व बायकामाणसांस बरोबर घेतले होते. थोड्याच दिवसांत दादासाहेब फौजेसुद्धां नर्मदा उतरतात तोच त्यांस सुभेदार येऊन मिळाले व श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे दुसरेही सरदार येऊन दाखल झाले.

 तदनंतर ही जंगी मोहिम क्रमाक्रमाने हिंदुस्थानांतील राजे-