पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ५वा.


पतिवियोग


 मनुष्यप्राणी कितीही श्रीमान्, धैर्यवान्, शूर, राजकारस्थानी व सदाचारी असो, आणि अनेक संकटांतून त्याने आपणास चातुर्याने पार पाडिलेले असो, एकदा या विश्वभक्षक कालाची धाड त्यावर येऊन पडली ह्मणजे तेथे त्याच्या कोणत्याही गुणाची मात्रा चालत नाहीं; निमूटपणे त्या कालचक्राच्या फेऱ्यास मान देऊन इहलोकची यात्रा संपविणे त्यास भाग पडतें ! हा सृष्टिनियम लक्षांत आणिला ह्मणजे आमच्या चरित्रनायिकेच्या पतीचा जो आकस्मिक अंत झाला त्याबद्दल वाचकांस होणारे दुःख विचाराने आवरतां येईल.

 इ. स. १७५४ या वर्षास नुकताच आरंभ झाला होता. हा काल ह्मटला ह्मणजे आपणा महाराष्ट्रीयांच्या वैभवमंदिराचा कळस होता असे ह्मणण्यास हरकत नाही. त्या वेळी पेशवाईची सूत्रे ज्यांच्या हाती होती त्या श्रीमंत नानासाहेबांनी बहुतेक सर्व भरतखंड स्वतःच्या अमलाखाली आणिले होते. पोर्तुगीज, निजाम वगैरे बलिष्ट शत्रूची रग जिरवून त्यांस हतवीर्य करून सोडिले होते. दिल्लीपतीस आपल्या अगदी मुठीत ठेविले होते व रजपुतान्यांतल्या शूर हिंदुभूपतीस आपले मांडलिक करून