पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३८]
भाग चवथा.


लढाईवर जाणे झाल्यास त्यामुळे होणाऱ्या वियोगदुःखाचे दिवस ती साध्वी या पुत्राच्या मुखाकडे पाहून समाधानाने घालवीत असे.

 यानंतर आणखी तीन वर्षांनी अहल्याबाईला एक कन्या झाली जिचें नांव मुक्ताबाई असे होते. अहल्याबाईप्रमाणेच ती स्वरूपाने असून पुढे स्वभावानेही तशीच निपजली. ती कशी ती सर्व हकीकत याच चरित्रांत योग्य प्रसंगी वाचकांस आढळून येईल.

 याप्रमाणे सासूसासऱ्यांचा स्वतःच्या मुलाप्रमाणे लोभ, पतीची अत्यंत प्रीति, सेवकजनांची खरी निष्ठा, पुत्र आणि कन्या यांचे लालनपालन करण्यांत मनास होत असलेला नित्यानंद, आणि अपरिमित राजेश्वर्य, यांतील एकेक गोष्ट प्राप्त होण्यास मोठी पुण्याई लागते व तिचा लाभ झाल्यास होणाराचे दिवस मोठ्या सुखाने जातात. आमच्या अहल्याबाईस तर ही सारी सुखें प्राप्त झाली होती. मग तिचे संसारांतले दिवस आनंदानें कां न जावे ? विचार करून पाहिले असतां तिच्या सारखें सुख क्वचितच दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला मिळाले असेल.

 पण असे सुखाचे दिवस सर्व आयुष्यभर ठेवण्याचा देवाचा -अथवा दैवाचा ह्मणा हेतु नसतो. त्याच्या कृपेने ते प्राप्त झाले तरी फारच थोडे असतात, व ते क्षणासारखे भरकन् निघून जातात. हे खरे का खोटें याचा अनुभव प्रत्येकास आहेच. त्याचप्रमाणे आमच्या चरित्रनायिकेच्या वृत्तांताची स्थिति झालेली आहे. लहानपणी मातापितरांच्या प्रेमांत लडिवाळपणाने दिवस काढिले व तरुणपणाचे काही दिवस पतीच्या सुखकर समागमांत