पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३६]
भाग चवथा.


श्वराने असें स्त्रीरत्न आपणास दिल्याबद्दल तो निरंतर त्याचे आभार मानी.

 याप्रमाणे सासुसासऱ्यास, पतीस, व सर्व सेवकजनांस आपल्या आचरणाने आनंद देत असतां व आपण आनंदाने राहात असतां पतिपत्नींचा संयोग करून देणारा परमेश्वराच्या वरचा वकीलच की काय असा आमच्या चरित्रनायिकेस ऋतु प्राप्त झाला व त्या योगाने सुभेदारादि सर्व मंडळीस आनंद होऊन त्यांनी राजेलोकांच्या रीतीप्रमाणे तो समारंभ मोठ्या थाटाने केला.

 समारंभाच्या दिवशी रात्री, ज्यावर विविधोपभोगद्रव्यांनी युक्त अशी उत्तम शय्या घातली आहे असा हस्तिदंती छप्परपलंग एका श्रृंगारलेल्या ऐनेमहालांत मांडिला होता, व त्यांत अनेक सुगंधितैलाचे दीप प्रकाशित केले होते अशा सुखस्थली खंडेराव व अहल्याबाई यांची प्रथम ओळख झाली. त्या वेळी त्या चतुर आणि सुज्ञ अशा राजविलासी दंपत्याची बहुत वेळपर्यंत अनेक प्रकारची मनोरंजक संभाषणे झाली असली पाहिजेत; पण ती दुसऱ्या कोणास थोडींच कळणार आहेत ? या आनंदप्रद प्रसंगाचे इतकेंच वणर्न आमच्या वाचकांस देण्याचे आमचे हाती आहे, व चरित्रकारास याहून जास्ती देतां येतही नाही मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून उगीच एकाद्या कादंबरीग्रंथाप्रमाणे स्वकपोलकल्पित शृंगारिक वर्णन देऊन आह्मी प्रिय वाचकांचे मनोरंजन करूं इच्छित नाही.

 आतां अहल्याबाईचे आपल्या पतीशी वर्तन कसे होते