पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संसारसुख.

[३५]


 अहल्याबाईच्या सेवेला अनेक दासदासी होत्या, तरी तिने कधी त्यांना विशेष त्रास देऊन अथवा ऐश्वर्याच्या मदाने दुरुत्तरें बोलून आपणाविषयी त्यांच्या मनांत अप्रियता उत्पन्न होऊ दिली नाही. सर्वकाळ त्यांच्याशी ममतेने वागून त्यांना तिने इतके आपलेसे करून टाकिले होते की, ' आमची धनीन अहल्याबाई हिला परमेश्वर शंभर वर्षे आयुष्य देवो व ती आमचा प्रतिपाल करो ' असे त्यांच्या मुखातून नेहमी उद्धार निघत असत; व त्या योगाने जितकें तिच्या मनांस समाधान वाटत असे तितकें अनेक प्रकारचे मौल्यवान अलंकार अंगावर घालून व पुष्कळ राज्यैश्वर्य भोगूनही वाटत नसे.

 देवाविषयी तिच्या अंतःकरणांत पूर्ण भक्ति पूर्वीपासूनच उद्भवली होती ती पुढे मोठ्या ऐश्वर्यात पडल्यावरही किंचित् कमी झाली नाही. ती आपला सकाळचा सर्व वेळ तुळशीला प्रदक्षिणा घालण्यांत व बाळकृष्णाची पूजा करण्यांत घालवीत असे. या तिच्या विशेष देवभोळेपणाबद्दल तिचे सासूसासरे तिची नेहमी थट्टा करीत व कधीकधी तर तिला रागेंही भरत असत; तथापि तिने आपला नित्यक्रम कधीं सोडिला नाही.

 आपल्या लोकांत मुलीला ऋतुप्राप्त होईपर्यंत तिचा पतीशी कोणत्याही प्रकारें विशेष संबंध घडून येत नाही त्याप्रमाणेच अहल्याबाईची सासरी पांच वर्षे लोटून तिला ऋतुप्राप्त होईपर्यंत तिचा व खंडेरावाचा कधी भाषणाचादेखील प्रसंग आला नव्हता; तथापि आपल्या स्त्रीच्या अंगी असलेल्या अलौलिक सद्गुणांची आईबापांकडून व इतर सेवकजनांकडून नित्य होत असलेली वाखाणणी ऐकून त्यास फार धन्यता वाटे व परमे-