पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३४]
भाग चवथा.


रूपाने येऊन राहिली आहे असें वांटून त्याने तिजवर प्राणापलीकडे प्रेम ठेविल्यास त्यांत नवल कसले ?

 तिची सासू गौतमाबाई ही गृहप्रपंचांत मोठी शहाणी होती; तथापि तिचा स्वभाव थोडासा तापट असे, असे मागे सांगण्यांत आलेच आहे. हा तिचा स्वभाव अहल्याबाईच्या लक्षांत तिचे लग्न झाल्यापासूनच आलेला होता ह्मणून मोठ्या सावधगिरीने ती तिजशी वर्तन ठेवीत असे. तिला राग येईल अशी कोणतीही कृति तिने कधीं केली नाही, व एकाद्या गोष्टीत आपलाच हेका धरून तिचे मन कधी दुखविले नाही. तिच्या मर्जीप्रमाणे तिची सेवा करून व तिच्या अंगांत जे उत्तम गुण होते ते सर्व संपादन करून नेहमी तिच्या मुखातून आपल्या कल्याणाचे तिने आशीर्वाद मिळविले. लहान वयांत अशी गोष्ट करून घेण्यास केवढे शहाणपण व किती चातुर्य अंगांत असले पाहिजे बरें ?

 सुभेदारसाहेबांच्या दोघी मुली हरकुबाई व उदाबाई यांची लग्ने खंडेरावाच्या अगोदरच झाली होती. त्या कधी माहेरी आल्यास अहल्याबाई त्यांच्याशी मोठ्या प्रेमाने वागत असे व वडील बहिणीप्रमाणे त्या दोघींना मान देत असे; यामुळे त्यांना आपली भावजय अहल्या ही केवळ जिवलग मैत्रीण होऊन राहिली होती. शिवाय अहल्येने आपणास येत असलेले लिहणेवाचणे त्यांना शिकवून रिकामपणी ज्ञानसंपादनांत वेळ घालविण्याचा मार्ग दाखवून दिला होता ह्मणून त्यांनी तिला आपल्या नणंदेच्या अधिकाराने एक चकार शब्द बोलून देखील कधी दुखविले नाही. असे अकृत्रिम प्रेम फारच थोड्या नणंदाभावजयांत असेल यांत संशय नाही.