पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संसारसुख.

[३३]


तीत जमीनअस्मानाचे अंतर पडले. ममताळू आईबापांशी लडिवाळपणाने वागावयाचे दिवस जाऊन आतां सासूसासऱ्यांच्या आज्ञेत राहावयाचा प्रसंग आला; बालपणच्या माहेरच्या मैत्रिणी टाकून आतां नणंदांशी सहवास प्राप्त झाला; एकादी गोष्ट करणे न करणे हे तिच्या मनाच्या स्वाधीन न राहतां नवऱ्याच्या मर्जीवर अवलंबून राहिले; आणि सांप्रत तिला जे मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले त्याला शोभेल असे आपले वर्तन ठेवणे भाग पडले.

 गरीब असो वा श्रीमंत असो. प्रत्येक कुलीन कन्यकेला हे सर्व अथवा यांतील काही तरी योगायोग येतातच. पण त्यांतून उत्तम रीतीने पार पडून सर्वांकडून वाहवा ह्मणवून घेण्याचे व उभय कुलांस भूषण आणण्याचे फारच थोड्यांच्या हातून घडते; व तें जिच्या हातून घडते तीच खरी कुलवती होय. आमच्या चरित्रनायिकेने वरील सर्व कामें उत्तम रीतीने बजावून सर्वांकडून आपली वाहवा करून घेतली !

 तिचा सासरा मल्हारराव होळकर याची पूर्वीपासूनच तिजवर प्रीति होती, व ती तिने त्याची उत्तम प्रकारे सेवा करून आपणावर इतकी जडवून घेतली की, त्यास अहल्या ही आपल्या घरांतील सर्व माणसांत अधिक आवडती होऊन बसली. शिवाय अहल्येची पूर्वपुण्याईच अशी कांहीं जबर होती की, तिची वाणी कधी असत्य होऊच नये ! मल्हारराव कधीं लढाईवर जावयास निघाले म्हणजे ते या आपल्या प्रिय स्नुषेला विचारून जात, व तिने 'तुह्मांस या लढाईत जय मिळणार' असें म्हटले की, तो हटकून मिळावयाचाच; यामुळे सुभेदारसाहेबांस आपल्या घरांत ही मूर्तिमंत विजयश्रीच अहल्येच्या