पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ४ था.


संसारसुख.


 एकाद्या भयाण निर्जन प्रदेशांतून कोणास प्रवास करण्याचा निरुपायाने प्रसंग आल्यास तो त्यांतून मार्गक्रमण करीत असतां दुर्दैवाने ठिकठिकाणी त्यास सूर्याच्या उष्णतेने तप्त झालेली वाळूची मैदानें लागावी व तेणेकरून प्रवास कष्टतर होऊन त्याने वारंवार दुःखाने कपाळावर हात मारून पुढे पाऊल टाकीत असावं, अशा वेळी अवचित ज्यावर विस्तीर्ण आम्रवृक्षाची गर्द छाया पडली आहे असा एकादा जलाशय त्याच्या दृष्टीस पडल्यास कितीही घाईचे कार्य असले तरी तो त्या ठिकाणी क्षणभर जाऊन विश्रांति घेतल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणेच आमच्या चरित्रनायिकेच्या चरित्रांतील हा भाग वाचकांस वाटल्यावांचून राहणार नाही. अहल्याबाईचे लग्न झाल्यापासून पुढ़ें दहा वर्षांचा काल लोटेपर्यंत-ह्मणजे जोपर्यंत तिचा पति जिवंत होता तोपर्यंत जे तिच्या आयुष्याचे दिवस गेले तेच काय ते पूर्ण सुखाचे होत. त्यानंतरचा सर्व काल तिजवर दुर्दैवाने एकामागून एक आलेली दुःखे सोसण्यांत तिला कंठावा लागला ! त्याचे यथातथ्य वर्णन पुढे जसजसे हे चरित्र वाचकांच्या वाचण्यांत येईल तसतसे आमच्या वरील लेखाची सत्यता त्यांस कळून येईल. असो.
 अहल्याबाईचे लग्न झाल्यावर तिच्या पूर्वीच्या व सांप्रतच्या स्थि-