पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२६]
भाग तिसरा.


त्यांचे स्नेहीसोबती पुष्कळ होते; आणि अहल्या ही त्याला एकुलती एकच कन्या असल्यामुळे व तिचा विवाह एका मोठ्या संस्थानच्या अधिपतीच्या पुत्राशी होणार असल्यामुळे या वेळी त्या सर्वांस सकुटुंब आपल्या घरी बोलवावयाचे असा त्याचा निश्चय होऊन तो त्याने आपल्या स्त्रियेस सांगितला व त्याला तिचे लागलेच अनुमोदन मिळाले. मग त्याने आपला मित्र जो तेथील पंतोजी त्याच्या मदतीने लवकरच सर्व तयारी केली व लग्नतिथीच्या अगोदर पंधरा दिवस पुण्यास येऊन राहिला.
 आनंदराव गरीब होता ह्मणून त्याची सर्व तयारी लवकर आटपली. पण इकडे सुभेदारसाहेबांकडे अगदी उलट प्रकार होता. ते संस्थानिक असल्यामुळे त्यांना आपल्या ऐश्वर्याप्रमाणे सर्व तयारी करावयाची होती; व या समारंभास हिंदुस्थानांतील लहान मोठे राजे जे त्यांचे मित्र झाले होते त्या सर्वांस बोलाविले पाहिजे होते. तरी तत्संबंधी सर्व तयारी त्यांचे येणें पाथरडीहून पुण्यास झाल्यानंतर त्यांनी दोघां इसमांकडून लवकरच करविली.

 मल्हाररावांस सुभेदारीचा अधिकार दिला त्याच वेळेस त्यांच्या दिवाणगिरीची जागा श्रीमंतांनी गंगाधर यशवंत नांवाच्या एका हुषार ब्राह्मणास दिली होती. त्यावर सुभेदारांचा पूर्ण विश्वास असे. या वेळी लग्नासंबंधी सामान आणणे, आलेल्या व-हाडी मंडळीची सर्व प्रकारची व्यवस्था लावणे, लग्नसमारंभाकरितां भव्य मंडप घालणे व त्यासाठी वाटेल तितका खर्च करणे ही सर्व व्यवस्था दिवाण गंगाधर यशवंत याच्या गळ्यांत सुभेदारसाहेबांनी घातली व त्यानेही त्यांच्या आज्ञेप्रमाणे ती उत्तम रीतीनें बजाविली.