पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[२५]


 अहल्येची जन्मपत्रिका कांही आमच्या पाहण्यात आली नाहीं; तथापि खंडेरावाचे तिच्याशी लग्न ठरतांना ज्या ब्राह्मणांनीं ती पाहिली ते मूर्ख होते अथवा तिचे लग्न झाल्यावर जो पुढे थोड्याच दिवसांनी तिजवर वैधव्यदुःखाचा प्रसंग आला ह्मणून तिच्या जन्मपत्रिकेत तिचे असलेले अनिष्टग्रह त्यांस माहीत असून ते त्यांनी सांगितले नाहीत, असा आह्मी त्यांस दोष देत नाही. यावर वाचकांचे समाधान होण्याकरितां आह्मी इतकेंच सांगतों की, श्रीरामचंद्रास राज्यावर बसण्यास वसिष्ठानें काढिलेल्या मुहूर्तावर त्यास वनवासास जावे लागलें ह्मणून, त्याबद्दल कोणी वसिष्ठास दोष देईल काय ? तर हा सारा देवापेक्षाही एका मात्रेने अधिक असणाऱ्या दैवाचाच प्रभाव होय! पण याविषयी इतक्यांतच विशेष वाटाघाट कशास पाहिजे ? अजून अहल्येचे लग्न होणे आहे.

 श्रीमंतांनी निरोप दिल्यावर ज्योतिष्याचे वचन खरे झाले म्हणून हर्षभरित होत्साता आनंदराव आपल्या प्रिय कन्येसह घरी येऊन त्याने झालेला सर्व प्रकार आपल्या पत्नीस कळविला. त्या वेळी तो ऐकून तिला झालेला आनंद किती वर्णावा ! त्याच्या भरांत ती नवऱ्यास ह्मणाली की, ' माझी अहल्या प्रत्यक्ष कोल्हापुरची जगदंबा आहे ! तेव्हां ती अशाच ठिकाणी पडली पाहिजे ! ! ' यानंतर आणखी आनंदरावाने तिला सांगितले की, मुहूर्त येत्या मार्गशीर्ष महिन्यांत ह्मणजे आणखी एक महिन्याच्याच अवकाशाने धरिला आहे, तर तोपर्यंत आपणास लग्नाची सर्व तयारी करून पुण्यास गेले पाहिजे.

 आनंदराव अगदी साधारण स्थितींतला मनुष्य होता, तरी