पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[२७]


 मल्हारराव होळकरांचा पुतण्या तुकोजी ह्यणून कोणी होता तो त्यांच्याप्रमाणेच रणशूर व वडिलांची आज्ञा पाळण्याविषयी सदा तत्पर असल्यामुळे त्यास त्यांनी आपल्या पदरी बाळगिले होते; व त्याच्या अंगच्या योग्यतेप्रमाणे त्यास आपल्या खासपागेचा सर्व अधिकार दिला होता. ( हाच तुकोजी पुढे मल्हाररावांचा निर्वश झाल्यावर होळकरांच्या गादीचा वारस होणार होता. ) त्यास दुसरी सर्व व्यवस्था ह्मणजे आपले सर्व नातेवाईक, स्नेही व लहानमोठे राजेरजवाडे यांस लग्नाकरितां निमंत्रण करावयास जाऊन घेऊन यावयाचे व ते आल्यावर त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांची योग्य व्यवस्था लावून त्यांत काही कमी पडू द्यावयाचें नाहीं-ही सांगून आपण स्वस्थ राहिले. तुकोजीने वडिलांची आज्ञा शिरसा मान्य करून लागलीच सर्व आप्तांची, स्नेहीमंडळीची व राजेरजवाड्याची नांवनिशीवार यादी करून त्यांना निमंत्रण करण्याकरितां गमन केले.

 सुभेदारसाहेबांचा स्वभाव मोठा उदार असल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्यातरी रीतीने हिंदुस्थानांतील लहानमोठ्या सर्व संस्थानिकांवर व त्यांच्या सर्व आप्तांवर उपकार झाले होते; ह्मणून त्यांच्या उपयोगी पडण्याचा प्रसंग येईल तितका बरा अशी प्रत्येकाच्या अंतःकरणांत इच्छा होई, व तसा आल्यास जो तो आपणास धन्य मानी; यामुळे तुकोजीरावाच्या मार्फत मल्हाररावांच्या घरचे बोलावणे पोंचल्यावर लग्नसमारंभास आठ दिवस अवकाश आहे तोच सर्व राजेरजवाडे व त्यांचे सोयरेधायरे आपआपल्या परिवारासह पुण्यास आले. व त्या योगाने सर्व शहर गजबजून गेले.