पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२४]
भाग तिसरा.


साहेब सुभेदारांस पुनः बोलले की, आतां कोणतीही हरकत राहिली नाही. मग त्यांनी खंडेराव व अहल्या यांस आपल्या जवळ बसवून त्यांचा जोडा कसा शोभतो ते पाहिले, व त्या योगाने समाधान पावून सुभेदारांस ह्मणाले 'आह्मांस तर हा अहल्याखंडेरावाचा जोडा पाहून फार आनंद झाला आहे, तर आतांच्या आतां लग्नतिथी नेमून साखरपुडा होऊ द्या !

 ज्या कार्यास प्रत्यक्ष श्रीमंतांचे अनुमोदन मिळालें तें होण्यास कितीसा अवकाश लागणार आहे ? लागलीच त्यांच्या जवळ निरंतर असणाऱ्या दोघां विद्वान् ब्राह्मणांनी अहल्येची पत्रिका पाहून सुभेदारांस सांगितले की, ही मुलगी पुढे मोठी कीर्तिवान् होणार आहे. इचे ग्रह इतके उंचे आहेत की, तिजबरोबर लग्न करणारा वर मोठा भाग्यशालीच असला पाहिजे व त्याप्रमाणे आपले चिरंजीव आहेतच. ह्मणून हा जोडा मोठ्या आनंदाने व सुखाने राहील.' नंतर जवळचे पंचांग काढून त्यांस लाभणारी जवळची लग्नतिथी कोणती ती त्यांनी सुभेदारांस सांगितली.

 नंतर सुभेदार आनंदरावास ह्मणाले, 'झाले. आतां कांही एक पहावयाचे उरले नाही. तुमची अहल्या आह्मांस पसंत पडली, व याच ठरलेल्या तिथीस या उभयतांचे लग्न पुणेमुक्कामी करावयाचे, तर तुह्मी आतांपासून सर्व तयारी करून पुण्यास या, हे त्यांचे भाषण आनंदरावाने आपणास मान्य आहे असे दाखविल्यावर लागलाच सुभेदारांनी लग्न ठरल्यानिमित्त साखरपुडा अहल्येला देऊन तिजसह आनंदरावास घरी जाण्यास परवानगी दिली.