पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[२३]


व इतर सरदारांच्या मनांत तिजविषयीं एकदम प्रेम उद्भवले. नंतर तिच्या शिक्षकास त्यांनी तिजविषयींची हकीकत विचारिली असतां त्याने ती मूळापासून सर्व त्यांस निवेदन केली व ती ऐकून सुभेदारांस फार आनंद झाला, व आपल्या खंडेरावास हीच बायको योग्य आहे असा त्यांचा विचार होऊन तो त्यांनी दादासाहेबांस सांगितला व त्यांनाही तो पसंत पडला.

 मग लागलीच त्या शिक्षकास पाठवून त्यांनी आनंदरावास बोलावून आणिलें व त्यास आपला मनोदय कळवून त्याचे मत काय आहे ते विचारिलें. तेव्हां त्यास परमानंद होऊन तो श्रीमंतांस ह्मणाला, ' मी सरकारचा यःकश्चित्, एक चाकर आहे, सुभेदारांसारख्यांचा व्याही होण्याची माझी योग्यता नाही, असें असतां माझी मुलगी आपली सून करण्याविषयी त्यांस इच्छा उत्पन्न झाली ही केवळ परमेश्वराची कृपा अथवा माझ्या मुलीचें भाग्य होय.

 या त्याच्या ह्मणण्यावर दादासाहेब सुभेदारांस ह्मणाले, "मुलीच्या बापाची संमति तर मिळाली. आतां खुद्द खंडेरावाचे काय मत आहे तें लागलेच विचारून घ्या. ' असें ह्मणून त्यांनी हास्ययुक्त मुद्रेनें खंडेरावाकडे पाहिले असतां तो आपल्या मनांत अहल्येला पाहून उत्पन्न झालेला आनंद किंचित् दाबून त्यांस मोठ्या नम्रतेने ह्मणाला, 'दादासाहेब, यांत माझें पोराचें तें काय मत घ्यावयाचे आहे ? वडील माझ्या अकल्याणाची गोष्ट कधी करणार नाहीत, तेव्हां ते जे करतील ते मला मान्य असलेंच पाहिजे. हे खंडेरावाचे भाषण ऐकून दादासाहेब, मल्हारराव व इतर सर्व मंडळी या सर्वांस आनंद झाला. नंतर दादा-