पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२२]
भाग तिसरा.


येथे कधी येणे झाल्यास त्यांची खासगी बैठक याच मारुतीच्या देवालयांत होत असे व त्यांचा मुक्काम तेथे असे तोपर्यंत अर्थात् त्यांत असलेल्या शाळेतील मुलांस सुट्टी मिळत असे. असो.

 आतां आमच्या चरित्रनायिकेच्या लग्नाचा योग कसा घडून आला तो पहा. श्रीमंत रघुनाथरावदादासाहेबांबरोबर मल्हारराव होळकर हे असून खंडेरावही त्यांच्या बरोबरच होता. सैन्याची वगैरे सर्व व्यवस्था लावून भोजनास अवकाश होता ह्मणून देवळाच्या सभामंडपांत बैठक टाकून सर्व सरदार मंडळी इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी बोलत बसली होती. तेथील शाळेचा पंतोजी हा आपल्या सर्व शिष्यांस सुट्टी देऊन श्रीमंतांच्या जवळ बसून त्यांच्या ह्मणण्यास मान डोलवीत होता. इतक्यांत, ज्याच्या सुशिक्षणामुळे व विशेष लडिवाळपणामुळे जिला त्यावांचून घटकाभर देखील दूर राहावत नसे अशी आमची अहल्या त्या ठिकाणी काही निमित्ताने येऊन आपल्या पंतोजीजवळ बसली. जणूं काय तिच्या भाग्योदयानेच तिला पुढे घालून या वेळी तेथे आणिली !

 छानदार मुखचर्या ही मुकी शिफारस होय, असे कोणी म्हटले आहे ते खरे आहे. ती बघताक्षणीच त्या मनुष्याविषयी बघणाराच्या मनांत प्रेम उत्पन्न होते. आमच्या अहल्येचा चेहरा जरी कवींनी आपल्या ग्रंथांत वर्णन केलेल्या रूपवतींच्या चेह-यांप्रमाणे सर्वांशी सुंदर नव्हता तरी त्यावर जे एक प्रकारचे नैसर्गिक राजतेज परमेश्वराने ठेविलेलें झळकत होते ते पाहून तिजविषयी कोणाच्याही मनांत तत्काल प्रेमभाव उत्पन्न झाल्यावांचू राहात नसे. यामुळे तिला बघताक्षणींच श्रीमंत दादासाहेबांच्या, मल्हाररावांच्या