पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[२१]


धन्याच्या महत्कार्यात गुंतून गेल्यामुळे ह्मणा, अथवा खंडेरावाच्या नशीबी त्यास एका अलौकिक स्त्रीची प्राप्ती व्हावयाची असल्यामुळे ह्मणा, इतका वेळपर्यंत त्यांस प्रिय पुत्राचे लग्न करितां आलें नाही.

 या वेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची कारकीर्द नुकतीच सुरू झालेली असून त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक मरणाने उत्तर हिंदुस्थानांत चाललेले लढाईचं काम अर्धेच तहकूब झाल्यामुळे त्यांच्या शत्रूंना बराच जोर येऊन ते पेशव्यांचा गुजराथ व माळवा या प्रांतांत असलेला अंमल झुगारून देण्याच्या प्रयत्नास लागले होते. त्यांचा बंदोबस्त करून देशांत शांतता करण्याकरितां श्रीमंतांनी आपले बंधु रघुनाथरावदादासाहेब पेशवे यांस, त्यांच्या मदतीस मल्हारराव होळकर व इतर सरदार आपआपल्या सैन्यांसह देऊन पाठविले होते व त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते लवकरच तिकडचा सर्व बंदोबस्त करून व मोठा विजय संपादन करून श्रीमंतांच्या भेटीकरितां पुण्यास येण्यास निघाले होते.

 पाथरडीगांवांत श्रीमंतांच्या सैन्याची छावणी होती असे मागे सांगण्यांत आलेच आहे. श्रीमंतांची स्वारी कधी उत्तरहिंदुस्थानांतून आली ह्मणजे तिचा मुक्काम बहुतकरून या ठिकाणी झाल्याखेरीज राहात नसे. त्याप्रमाणे विजयश्री संपादन करून दादासाहेबांची स्वारी आपल्या सर्व सरदारांसह पुण्यास चालली असतां भरदोनप्रहरचे वेळी पाथरडीच्या मुक्कामास आली. आनंदरावाच्या घरासमोरचे मारुतीचे देऊळ बरेंच मोठे असून कोणी सरकारी कामगार व खुद्द श्रीमंत पेशवे यांचे