पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२०]
भाग तिसरा.


नाही. मात्र त्या कोणी घडवून आणूं म्हटल्याने घडणें नाहींत. आपल्या मुलीला एकादें सुस्थल पाहण्याविषयी प्रयत्न करून आनंदराव थकला, पण तिच्यासंबंधाने ज्योतिप्याने केलेलें भविष्य खरे होण्याचा व त्याची काळजी नाहीशी होण्याचा प्रसंग निराळ्याच प्रकाराने अवचित् घडून आला. सुभेदार मल्हारराव होळकर यांस खंडेराव या नांवाचा एकुलता एक मुलगा होता, असें मागे सांगण्यांत आले आहेच. तो या वेळी चांगला वयांत आला असून आपल्या पित्याच्या मराठ्यांचे राज्य वाढविण्याच्या अंगीकृत कार्यास हातभार लावण्यासारखा झाला होता. तो शरीराने चांगला सुदृढ असून शिकार खेळण्याचा त्यास फार शोक असे, व अनेक वेळां श्रीमंत शाहूमहाराजांबरोबर अरण्यांत जाऊन तेथें रानडुकरांची शिकार करून खुद छत्रपतींकडून त्याने आपली वाहवा करून घेतली होती. याशिवाय साधारण लिहणे, वाचणे, तालीम करणे, वगैरे त्या वेळी सर्व मराठे सरदारांच्या अंगी जे गुण अवश्य असावे लागत ते सर्व त्याने संपादन केले होते.

 आपल्या मुलाच्या अंगांत असलेले गुण पाहून व छत्रपतीकडून त्याची वाहवा झालेली ऐकून मल्हारराव व त्याची स्त्री गौतमाबाई यांस फार आनंद होत असे व त्यावर ते प्राणापलीकडे प्रेम करीत असत. खंडेराव आतां लग्नाला योग्य झाला आहे यासाठी त्याचे एकाद्या कुलीन व सुशील मुलीबरोबर लग्न करून टाकावे, ह्मणून गौतमाबाईने मल्हाररावांस सांगितले व त्यांचाही त्याचप्रमाणे बेत झाला. तथापि त्यांचा वरपक्ष असल्यामुळे त्याविषयी त्यांना विशेषशी काळजी करावी लागली नाही. एक दोन वेळा खंडेरावास मुली सांगून आल्या होत्या, पण त्या वेळी ते