पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३ रा.


लग्नसमारंभ.


 ज्योतिष्याने आनंदरावास, ' तुझी कन्या एका मोठ्या संस्थानिकाच्या घरांत पडेल ' असे सांगितले होते व त्यावर त्याचा पूर्ण विश्वासही होता; तथापि मुलीला नववें वर्ष लागले तरी अजून तसा कांहीं योग घडून येत नाही, व तिला आतां तशीच अधिक वाढविणे चांगले नाही, कदाचित् त्यामुळे तिच्या अंगीं कांहीं खोड आहे असा लोक संशय घेतील, असा विचार करून आनंदराव आपल्या डोळ्यांदेखत एकादें सुस्थल पाहून लग्न करण्याच्या प्रयत्नास लागला, पण उपयोग काय ? सागराशिवाय महानदीचा योग दुसऱ्या कोणाशी होणार ? अनेक ठिकाणी हिंडून त्याने पुष्कळ स्थळे पाहिली. पण त्याच्या मनाजोगते एकही त्यास आढळून येईना. अखेरीस ज्याने कृपाळू होऊन या कन्येस आपल्या उदरी घातलें तो परमेश्वर तिला योग्य स्थळ देऊन आपली चिंता नाहींशी केल्यावांचून राहाणार नाही अशा विश्वासावर त्याला समाधान मानून राहाणे भाग पडले.

 जगांत ज्या काही विलक्षण गोष्टी घडून येतात त्या कशा घडल्या याचा आपण विचार करू लागलों असतां त्यास जितका वेळ लागेल तितका त्या घडून येण्यास देखील लागत