पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म व बाळपण.

[१७]


ती आपल्या आईबापांसच काय, पण त्या खेड्यांतील सर्व लहानथोर लोकांस केवळ जीव की प्राण होऊन राहिली. स्त्री असो, पुरुष असो, ज्याला त्याला तिला आपण आपल्याजवळ क्षणभर तरी घेऊन बसावे असे वाटत असे व त्यांच्यांत तिला घेण्याविषयी कितीकदां भांडणे देखील होत.

 मागें आनंदरावाचा मित्र तेथील शाळेचा पंतोजी ह्मणून जो सांगण्यांत आला आहे, त्याला अपत्य मुळीच नव्हतें, यामुळे त्याचा स्वाभाविक अहल्येवर कन्येप्रमाणे लोभ जडला व तो इतका वाढला की, तो तिला आपणापासून क्षणभरही दूर करीत नसे. त्याने तिला लिहावयाला व वाचावयाला शिकविले होते, त्यामुळे अहल्येची त्यावर इतकी भक्ति जडली होती की, तशी प्रत्यक्ष आपल्या आईबापांवरही नव्हती. पुढे मोठेपणी तिने आपले आयुष्य पोथ्यापुराणें वाचून जें सुखाने घालविले त्याचे सर्व श्रेय या पंतोजीने तिला जे शिक्षण दिले त्याकडेसच येतें .

 त्याला भारतरामायणांतील बहुतेक कथा माहित होत्या, त्या त्याने सर्व तिला सांगितल्या. त्या अहल्या मोठ्या प्रेमानें ऐके. त्यांतही सीतेचा वनवास, द्रौपदीचा अज्ञातवास, तसेच सावित्री, दमयंती, अहल्या वगैरे साध्वी स्त्रियांचा वृत्तांत यावर तिची अत्यंत प्रीति जडली असून पुनः पुनः त्या कथा सांगण्याविषयी ती आपल्या गुरूस वारंवार आग्रह करीत असे. जणूं आपणास दुर्दैवाने पुढे याच मासल्याचा दुःखकारक प्रसंग भोगावयाचा आहे, तर त्या वेळी धैर्याने वागतां यावें ह्मणून बालपणांत आपल्या पंतोजीपासून तिने त्याचा धडाच घेऊन ठेविला होता ! असो.